४५ वयोगटावरील नागरिक वंचितच

नागपूर : शहरात सलग तिसऱ्या दिवशी लसींचा तुटवडा कायम होता. ४५ वर्षांवरील अनेक  नागरिकांना दुसरी मात्रा घ्यायची आहे, मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे  लसीचा तुटवडा आहे. शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर फेरफटका मारला असता आज लसीकरण होणार नाही, असे फलक लावलेले दिसले. हे फलक बघून नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

शहरातील लसीकरणासाठी पुरेसा साठा प्राप्त न झाल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार नाही. महापालिकेच्या प्रभाकरराव दटके, महाल रोगनिदान केंद्र वगळता इतर केंद्रांवर लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. उद्या लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा दिली जाईल. स्व.प्रभाकरराव दटके, महाल रोगनिदान केंद्र येथे कोव्हॅक्सिन दिली जाईल. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण महापालिकेद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहील. विशेष म्हणजे, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ढिसाळ नियोजनामुळे लसींचा तुटवडा  – अ‍ॅड. आरोप

लसीसंदर्भातील राज्य सरकारचे ढिसाळ नियोजन आणि व्यवस्थापनामुळे आज सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत असल्याचा आरोप भारतीय जनता प्रदेश सचिव व नगरसेवक अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. राज्यासह नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये असलेला लसीचा तुटवडा दूर करण्याच्या संदर्भात  मेश्राम यांनी राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आयुक्त राधाकृष्णन बी. यांना पत्र पाठवून लस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.   राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जनतेची काळजी असती तर त्यांनी आधीच राज्यात लस खरेदी करून ठेवली असती. मात्र ते न केल्यामुळे आता केवळ केंद्राकडून मिळणाऱ्या लसीवरच जनतेचे लसीकरण होणार आहे, याकडेही मेश्राम यांनी लक्ष वेधले आहे.