राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचे निलंबन करण्यात आले आहे. महावीर जाधव यांच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत विशेष हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला काँग्रेस, शिवसेनेसह सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी निलंबनाचे आदेश दिले. दरम्यान, याप्रकरणावरून सर्वच पक्षीय आमदारांनी मुजोर अधिकाऱ्यांविरोधातील आपल्या तक्रारी मांडल्या. विधानसभेत लोकप्रतिनिधी आणि पोलीस असे चित्र निर्माण झाले होते. आमदारांनी निलंबित ऐवजी कार्यमुक्त करण्याची आग्रही मागणी केली.

आव्हाड म्हणाले की, राज्यातील आमदारांची खिल्ली उडवली जाते. महावीर जाधव यांनी भीमराव नलगे या व्यक्तीच्या घरी जाऊन दारूच्या नशेत गोंधळ घातला. छगन भुजबळ यांचा याप्रकरणात संबंध नसताना त्यांनी शिवीगाळ केली. जाधव यांना निलंबित करा, अधिकारी मुजोर झाले आहेत. ते एकाही लोकप्रतिनिधीला विचारत नाहीत.

यावेळी शिवेसेनेचे आमदार सुनील प्रभू, राजेश क्षीरसागर, भाजपाचे एकनाथ खडसे, आमदार बच्चू कडू आदींनी मुजोर अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीचा पाढाच वाचला. कोणत्याही आमदारांचा अपमान होत असेल तर तात्काळ निलंबित करा, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या विशेष हक्कभंग प्रस्तावाला पाठिंबा दिला. राजेश क्षीरसागर यांनीही महिला आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. भुजबळांना न्याय दिला. आम्ही काय चूक केली. मागील ६ वर्षांपासून सभागृहात तक्रार करत आहोत पण अजूनही न्याय मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एकनाथ खडसे यांनी लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान मिळायला हवी, अशी मागणी केली.