रिपाइंच्या विदर्भ परिषदेत अ‍ॅड. श्रीहरी अणे यांचे आवाहन

भाजप स्वतंत्र विदर्भ राज्य देऊच शकत नाही, आपल्याला विदर्भ हवा असेल तर येणाऱ्या दिवसात भाजपला विदर्भ देण्यास बाध्य करा किंवा आगामी निवडणुकीत त्यांना पराभूत करा, असे रोखठोक आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

स्वतंत्र विदर्भासाठी रिपाइं (आठवले)तर्फे सोमवारी आयोजित स्वतंत्र विदर्भ परिषदेत अ‍ॅड. श्रीहरी अणे बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे आमदार आशीष देशमुख, प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर, माजी खासदार दत्ता मेघे आदी विदर्भवादी नेते उपस्थित होते.

येत्या सहा महिन्यांत प्रस्ताव (विधेयक) सरकारने आणले तरच स्वतंत्र विदर्भ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणलेल्या प्रस्तावाला कायद्याने काहीच उपयोग होणार नाही आणि पुन्हा पाच वर्षे वाट पहावी लागेल. निवडणुकीच्या वेळी स्वतंत्र विदर्भ देऊ, अशी भाषा बोलणारे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता विकास झाल्यानंतर विदर्भाबाबत विचार करू, असे विधान करीत आहे. आम्हाला विकास नको तर विदर्भ राज्य हवे आहे. राज्यात आणि देशात जी विकासकामे सुरू आहेत ती विदर्भाच्या काहीच कामाची नाही. जो विकास विदर्भाला अपेक्षित आहे तो होत नाही. ३४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या कशा थांबवता येतील, कर्जमाफी केली जात नाही.

आगामी निवडणुकीत विदर्भाच्या मुद्यावर सर्व विदर्भवादी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही शत्रू आहेत. गुजरातमध्ये पाटीदारांनी जसे आंदोलन करून भाजपला हिसका दिला आहे तसे विदर्भाच्या प्रश्नावर विदर्भवादी एकत्र आले तर राज्यात आणि केंद्रात त्याचा फटका बसेल. मात्र, त्यासाठी सर्व रिपब्लिकन गट एकत्र येण्याची गरज आहे, असे अ‍ॅड. अणे म्हणाले. यावेळी रामदास आठवले आणि दत्ता मेघे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन बाळू घरडे यांनी केले.

अन्यथा राजीनामा देईन

स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करीत आहे. विदर्भावर कसा अन्याय केला जात आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने येत्या सहा महिन्यात त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही तर विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी दिला.

रिपाइं भाजपसोबतच -आठवले

राज्य सरकारमध्ये शिवसेना सध्या भाजपसोबत असले तरी येणाऱ्या काळात दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले तर राज्यात शिवसेनेचे अस्तित्व कमी होणार आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष हा भाजपसोबत राहील, असे मत केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भाजपची भूमिका ही छोटय़ा राज्याची आहे. मात्र, राज्य सरकारमध्ये शिवसेना सहभागी असल्यामुळे सध्या विदर्भाची मागणी पूर्ण होणार नसली तरी दीड वर्षांनी होणाऱ्या निवडणुका भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. शिवसेनेशी युती करण्यास भाजप उत्सुक नाही. त्यामुळे देशभरात भाजपमय वातावरण असल्यामुळे राज्यात शिवसेनेचे अस्तित्व कमी होईल. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्यात काही रस नाही. भाजपसोबत राहून स्वतंत्र विदर्भ मिळवून घेऊ, असेही आठवले म्हणाले. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाली असली तरी त्यामुळे काँग्रेस पक्षात फारसा फरक पडणार नाही. उलट त्यामुळे देशभरात भाजप वाढेल. यूपीएमधील काही घटक पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे काँग्रेस फारसा वाढणार नाही, असेही आठवले म्हणाले.