श्रीहरी अणे यांची घोषणा; शिवसेना-मनसेला जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन

कुठलाही राजकीय पक्ष वेगळा विदर्भ देणार नाही, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विदर्भ राज्य आघाडी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

विदर्भ राज्य आघाडीच्या विदर्भस्तरीय कार्यकत्यार्ंचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विदर्भाच्या प्रश्नावर जर विविध पक्ष निर्माण झाले, तर सर्वाना संघटित करून ज्यांची ताकद ज्या ठिकाणी आहे त्या जागा वाटपासंदर्भात निर्णय घेतला जाईल. दरम्यानच्या काळात जर भाजपने विदर्भ राज्याच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पुढे काय करायचे ते नंतर ठरवता येईल. मात्र, तूर्तास तशी शक्यता नसल्याचे अ‍ॅड. अणे म्हणाले.

स्वतंत्र विदर्भासाठी आजवर झालेली आंदोलने फलदायी नाहीत. विधानभवनावर अनेक वर्षांपासून मोर्चे काढले जातात. ती तेवढय़ापुरती असतात आणि नंतर ती विस्मरणातही जातात. त्याचा राजकीय आणि प्रशासन पातळीवर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळेच स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवायचे असेल तर राजकीय पक्ष स्थापन करून सत्ता मिळवून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करणे, हा एकच पर्याय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विदर्भाच्या बाजूने असतील आणि त्यांनी दिलेली आश्वासने खरी असतील तरी ते त्यांच्या पक्षातील नेत्यांमुळे पावले उचलण्यासाठी तयार नाहीत, हे वास्तव आहे. पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी बंद करण्याची हीच वेळ असल्याने युवकांनी समोर येण्याची गरज आहे.

स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या नेत्यांविरोधात शिवसेना किंवा मनसे हे राजकीय पक्ष आक्रमक होत असतील, तर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी शांत राहण्याची गरज नाही. जेथे कुठे विदर्भाचा आणि विदर्भातील नेत्यांचा अपमान केला जात असेल तर तो सहन न करता त्यांना उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी केले.

 भाजपबाबत शंका

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना विदर्भ देणे सहज शक्य आहे. मात्र, नवीन एखादा विषय येतो आणि विदर्भाचा मुद्दा बाजूला होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे भाजप विदर्भ राज्य करेल की नाही, याबाबत शंका आहे. गाय पाळता आली असती, तर महात्मा गांधी यांनी गाय पाळली असती, बकरी पाळली नसती, अशी टीका करून अ‍ॅड. अणे यांनी सरकारच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

मराठय़ांना आरक्षण मिळायला हवे

राज्याच्या विविध भागात मराठा समाजाच्या निघणाऱ्या मोर्चाचे अ‍ॅड. अणे यांनी समर्थन केले.मराठय़ांना आरक्षण मिळायला हवे आणि कायद्याने ते देणे शक्य आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असून त्यात बदलाची गरज आहे, पण देशात हा कायदा असणेही गरजेचे आहे.

 

दानवे यांना धमकी

जालना : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना ई-मेलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून विलास देशमुख नावाच्या व्यक्तीविरुद्ध कदीम  जालना पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

जिल्हा भाजप कार्यालयातून या संदर्भात सांगण्यात आले, की खासदार दानवे यांच्या ई-मेलवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदारकीचा राजीनामा द्या अन्यथा आपणास जीवे मारण्यात येईल, अशी धमकी आली होती. खासदार दानवे यांच्या भोकरदन येथील कार्यालयातील स्वीय सहायक गजानन तांदुळजे यांनी ही माहिती त्यांच्या जालना येथील स्वीय सहायक राजेश जोशी यांना कळवली.या संदर्भात जालना येथील रहिवासी विलास देशमुख याच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.