शुभांगी राऊत, वय वर्षे १३. शहरातील एका झोपडपट्टीत राहणारी शुभांगी यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्युडो खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. शुभांगीचे वडील भाजीबाजारात रस्त्याच्या कडेला बसून कांदा, लसूण विकतात. दिवसभराच्या कमाईवर पोट भरणाऱ्या या कुटुंबाजवळ शुभांगीची निवड झाली तेव्हा गणवेश व इतर साहित्यासाठी जमा करावे लागणारे ३० हजार रुपये नव्हते. अखेर तिच्या प्रशिक्षकांनी व ज्युडो प्रशिक्षण संघटनेने धावाधाव केली व कसेबसे पैसे गोळा केले, त्यामुळे अखेरच्या क्षणी तिचा भारतीय संघातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. ऑलिम्पिकमधील अपयशाच्या निमित्ताने खेळात आपण मागे का, यावर समाजातील सारे चर्चा झोडत असताना व राज्य सरकार पदक मिळवणाऱ्यांचे सत्कार करण्यात व्यस्त असताना शुभांगीसाठी पैसे जमवण्याची धावपळ या उपराजधानीत सुरू होती. शुभांगीला मदतीची गरज आहे, असे आवाहन करणाऱ्या पत्रकालाही कुणी फार गांभीर्याने घेतले नाही. जेव्हा मदतीची गरज असते, तेव्हा दुर्लक्ष करायचे आणि नंतर त्याच खेळाडूने नाव कमावले की, घोषणांचा पाऊस पाडायचा, हा खेळाप्रति असलेला सध्याचा प्रचलित दृष्टिकोन आहे. खेळात आपण समोर का नाही, या प्रश्नाचे उत्तर या दृष्टिकोनात सामावलेले आहे.

या शहरातील शुभांगीने भारतीय संघापर्यंत मजल मारली, पण तिच्यासारखे अनेक गरीब खेळाडू सध्या ज्युडोचा सराव करतात. त्यासाठी लागणारी साधी मॅट सरकारकडून त्यांना कधी उपलब्ध झाली नाही. प्रशिक्षकांनी देणगीची भीक मागायची, सुमार दर्जाचे साहित्य घ्यायचे व खेळाडूंचा सराव कसाबसा करून घ्यायचा, असा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. या उपराजधानीत भव्य क्रीडा संकुल आहे. खेळाकडे लक्ष द्या, असे सांगणारे राज्यकर्ते आहेत तरीही वास्तवातील चित्र हे असे आहे. खेळ अथवा खेळाडूला प्रोत्साहन देणे म्हणजे यश मिळवल्यावर त्याचा सत्कार करणे, रोख बक्षीस देणे, हीच सरकारी यंत्रणेची भूमिका राहिलेली आहे. सरावाच्या काळात त्याला कोणत्या अडचणी येतात त्या सोडवायला कुणी तयार नाही. तशी मानसिकताही कुणाची नाही. राज्यकर्ते तर दूरच राहिले, पण साधे अधिकारी सुद्धा नन्नाचा पाढाच वाचताना दिसतात. शुभांगी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. राज्याचा विचार केला, तर इतर विभागाच्या तुलनेत खेळात विदर्भ खूपच मागे आहे. विदर्भातील राज्यकर्त्यांनी याकडे कधी लक्षच दिले नाही. आता राज्याच्या मंत्रिमंडळात विदर्भाचे डझनावर मंत्री असताना सुद्धा परिस्थितीत फरक पडत नसेल, तर या सत्तेला काय अर्थ आहे? क्रीडा संकुल तयार करा आणि ती भाडय़ाने देऊन पैसा मिळवा, हीच संस्कृती विदर्भात आहे. म्हणूनच शुभांगीच्या यशाकडे कुणाचे लक्ष जात नाही व पैशासाठी तिच्या प्रशिक्षकांना वणवण भटकावे लागते.

केवळ खेळाच्या क्षेत्रातच हे घडते असे नाही. इतरही क्षेत्रात हीच उदासीन वृत्ती जागोजागी आढळते. प्रसेनजित यादव हा विदर्भातील युवा वन्यजीवप्रेमी. नॅशनल जिओग्राफिक या आघाडीच्या चित्रवाहिनीने यंदा वन्यजीवांवर विविध माहितीपट तयार करण्यासाठी जे दहा जण निवडले, त्यात हा यादव आहे. पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या ‘इंक टॉक’ या कार्यक्रमात तो देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सध्या जगभर भ्रमंती करणाऱ्या या तरुणाने व्याघ्रजीवनावर बरेच संशोधन केले आहे. पदवीनंतर त्याने विदर्भातील जंगलात वन्यजीव संशोधनासाठी खात्याकडे परवानगी मागितली, ती चक्क नाकारण्यात आली. त्यामुळे हिरमुसला होऊन प्रसेनजित बंगळुरूला गेला. तेथे कर्नाटक व केरळ या दोन्ही राज्यांनी त्याचा संशोधनाचा विषय बघून लगेच जंगलभ्रमंतीची परवानगी दिली. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर या तरुणाने माहितीपटाच्या क्षेत्रात जगभरात नाव कमावले. ते ऐकून आता वनखात्याचे अधिकारी त्याला जंगलात येण्याचे, वाघांवर संशोधन करण्याचे निमंत्रण देऊ लागले आहेत. अशी मागाहून अक्कल सुचण्याचे काम फक्त विदर्भातच होते. नॅशनल जिओग्राफिकच्या कामासाठी अनेक देशात जाण्याआधी प्रसेनजितने सहज म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्याची वेळ मागितली. दोघेही वैदर्भीय असल्याचा समान धागा ही भेट जुळवून आणेल, असा विश्वास या तरुणाला होता, पण तो खोटा ठरला. आणखी नाव कमावल्याशिवाय भेट मिळायची नाही, हे या तरुणाच्या लवकरच लक्षात आले. खरे तर, विदर्भातील वन्यजीवन अतिशय समृद्ध आहे. त्यातून निर्माण होणारे प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत. वन्यजीव-मानव संघर्ष, वाघांचे स्थलांतर, यासारखे अनेक विषय अभ्यासकांना खुणावणारे आहेत. यात होणारे संशोधन भविष्यात या समृद्धीला अधिक बळकटी देणारेच ठरणार आहे. अशा स्थितीत विदर्भातील युवक समोर येत असतील तर त्यांचे स्वागत व्हायला हवे, त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात, पण नेमके तेच घडताना दिसत नाही, हे विदर्भाचे दुर्दैव आहे. सत्तेतील फरक अशा ठिकाणी दिसला पाहिजे. नुसती चमकोगिरी काही कामाची नाही, हे राज्यकर्त्यांना सांगणार कोण? यशाच्या मागे धावणारे अनेकजण असतात. मात्र, ते मिळवण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टात मदत करण्याची तयारी कुणीच दाखवत नाही. केवळ राज्यकर्त्यांनीच नाही, तर समाजाने सुद्धा अशी तयारी दाखवायला हवी. नेमके तेच विदर्भात होताना दिसत नाही. शुभांगी असो वा प्रसेनजित, ही वानगीदाखल दिलेली उदाहरणे आहेत. अन्य क्षेत्रातही असे नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी धडपडणारे अनेक तरुण आहेत. त्यांच्यापर्यंत कधी आणि कसे पोहोचायचे, यावर आता सर्वानीच विचार करण्याची वेळ आली आहे. विदर्भावर अन्याय आणि विदर्भ मागास या घासून जुन्या झालेल्या टेप आहेत. आता त्यापलीकडे विचार व कृती करण्याची वेळ आली आहे, हेही सर्वानी लक्षात घेणे गरजेचे आहे.

देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com