08 December 2019

News Flash

स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास सांगणारा ‘सीताबर्डी किल्ला’

महात्मा गांधींच्या कारावासादरम्यानची कोठडी अजूनही तशीच

(संग्रहित छायाचित्र)

ब्रिटिश-मराठय़ांच्या युद्धाचे प्रतीक असलेला शहरातील सीताबर्डी किल्ला सध्या भारतीय लष्कराच्या ताब्यात असून पर्यटकांच्या दृष्टीने तो आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.  मात्र, सुरक्षितेच्या कारणाने तो केवळ राष्ट्रीय सणाच्या दिवशीच उघडण्यात येतो. त्यानुसार, उद्या १५ ऑगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत किल्ला बघता येणार आहे.

एकेकाळी ओसाड आणि दगडांच्या टेकडय़ांचा हा परिसर यदुवंशीयामुळे प्रकाशझोतात आला. येथे लहान टेकडी आणि मोठी टेकडी होती. या टेकडय़ांना दोन यदुवंशी बंधू शीतलाप्रसाद आणि बद्रीप्रसाद गवळी यांच्या नावावरून सीताबर्डी असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या किल्ल्यावर ब्रिटिश लष्करी छावणीचा ‘युनियन जॅक’ फडकत होता. देश सोडल्यानंतर त्यांनी हा किल्ला लष्कराकडे सोपवला.

८७० एकरवर वसलेला सीताबर्डी किल्ला इंग्रज विरुद्ध भोसले यांच्यातील युद्धाचे प्रतीक आहे. सीताबर्डीवर नागपूरचे राज्यकर्ते आप्पासाहेब ऊर्फ मुधोजी द्वितीय यांनी  ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढा दिला. अप्पासाहेब भोसले आणि ब्रिटिशांमध्ये नोव्हेंबर १८१७ मध्ये लढाई झाली. इंग्रजांनी सीताबर्डी परिसरातील दोन महत्त्वाच्या टेकडय़ा ताब्यात घेतल्या. ब्रिटिशांनी या दोन टेकडय़ांचे किल्ल्यांमध्ये रूपांतर केले. या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडाने केले आहे. येथे तोफखाना व दारूगोळा ठेवला जात असे. किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढवल्याची नोंद आहे. मोठी  टेकडी ‘किल्ला’ म्हणून ओळखली जाते तर लहान टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे.

पूर्णवेळ पयर्टनस्थळ व्हावे

सीताबर्डी किल्लय़ावर मराठय़ांच्या वैभवशाली इतिहासाची माहिती देणारे संग्राहलय व्हावे. येथे युद्धस्मारक उभारण्यात यावे. दिल्लीचा लाल किल्ला, पुण्याचा शनिवार वाडा, ग्वाल्हेर किल्ला, हैदराबादचा किल्ला हे सगळे वर्षभर जनतेसाठी खुले असतात. तेथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी साऊंडआणि लाईट शो सादर केले जातात. त्यातून किल्ल्याचा इतिहास सांगितला जातो. त्या धर्तीवर सीताबर्डी किल्ल्यात पर्यटन स्नेही गोष्टी विकसित करण्यात याव्यात, असे सामाजिक कार्यकर्ते व पर्यटन लेखक डॉ. हेमंत जोशी म्हणाले.

टिपू सुलतानच्या नातवाला फाशी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना या किल्ल्यावरील तुरुंगात १० एप्रिल ते १५ मे १९२३ या काळात ठेवण्यात आले होते. ती कोठडी अजूनही तशीच आहे. शिवाय इंग्रजांनी १८५७ च्या क्रांतीमध्ये सहभागी टिपू सुलतान यांचे  नातू नवाब कादर अली व त्यांच्या आठ सहकाऱ्यांना येथे फाशी दिली होती. सीताबर्डी परिसरात आप्पासाहेब ऊर्फ मुधोजी द्वितीय यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढाई केली. ही लढाई जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी येथील टेकडय़ांचे किल्ल्यात रूपांतर केले.  सध्या येथे लष्कराचे प्रादेशिक कार्यालय आहे.

First Published on August 15, 2019 1:02 am

Web Title: sitabuldi fort nagpur abn 97
टॅग Independence Day
Just Now!
X