News Flash

येचुरींच्या भाषणावरून नागपूर विद्यापीठात रणकंदन

राष्ट्रीय चर्चासत्र १८ आणि १९ मार्चला विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांचे भाषण रद्द करण्यावरून नागपूर विद्यापीठात रणकंदन माजले असून त्यांचे भाषण झालेच पाहिजे या मुद्दय़ावर पुरोगामी एकत्र आले आहेत. दरम्यान, कुलगुरूंनी एक समिती नेमून निर्णय घेण्याचा मार्ग सुचवला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र १८ आणि १९ मार्चला विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी येचुरी यांना निमंत्रित करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता झाली होती मात्र, बुधवारी अचानक व्याख्यान रद्द झाल्याचे प्रसारमाध्यमांना  कळवण्यात आले. अध्यासनाच्या प्रमुखाने कुलगुरूंची परवानगीच घेतली नव्हती, अभाविप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावापोटी चर्चासत्र रद्द झाल्याची चर्चा होती. त्यावर कुलगुरू  डॉ. सिद्धार्थ काणे यांनी कोणाचाही दबाव नसून केवळ प्रशासकीय कारणासाठी खासदार येचुरी यांचे भाषण रद्द न करता प्रशासकीय सोयींसाठी ते पुढे ढकलण्यात आल्याची प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली होती. अभाविपने त्यांच्या भाषणासाठी विरोध नसल्याचे आधीच कळवले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. ताराचंद्र खांडेकर, नागेश चौधरी आणि इतर सहकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन सीताराम येचुरी यांचेच व्याख्यान आयोजित करण्याची गळ घातली. कुलगुरूंवर दबाव आहे, येचुरींच्या संदर्भातील विरोधाचा हा भाग आहे, असे स्पष्ट मत प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. मनोहर यांनी व्यक्त केले. येचुरी यांच्या भाषणास नाकारणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पराभव करणे होईल, हे अयोग्य आहे. त्यामुळेच आंबेडकरवादी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी त्यामुळे येचुरी यांचे विद्यापीठात ठरलेले भाषण व्हायला हवे,  असे स्पष्ट मत कुलगुरूंकडे व्यक्त केले. त्यानुसार कुलगुरूंनी एक समिती स्थापन करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

येचुरी ठरल्याप्रमाणे उद्या शनिवारी नागपुरात येणार असून ‘लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने  व उपाय’ या विषयावर दीक्षाभूमीवरील आंबेडकर कॉलेजने त्यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

खासदार सीताराम येचुरी यांच्या भाषणासाठी आम्ही कुलगुरूंची रीतसर परवानगी घेतली आहे. त्यांना गेल्या महिन्यात २० फेब्रुवारीला पत्र दिले आहे. कुलगुरूंनी त्यांचे भाषण पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते पुढील आठवडय़ात होईल, अशी अपेक्षा आहे.   डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:04 am

Web Title: sitaram yechury
Next Stories
1 बर्डीवरील मेट्रो जंक्शन दोन वर्षांत
2 रात्रीच्या व्हॉट्सअप, फेसबुकचा नाद गंभीर आजाराला आमंत्रण
3 विभागप्रमुखांमधील वरिष्ठ डॉक्टरकडेच ‘सुपर’ची जबाबदारी द्या
Just Now!
X