शहरातील रुग्णांची एकूण संख्या २५ वर

नागपूर : शहरात करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. आज शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ६ नव्या रुग्णांची  भर पडली आहे. आता शहरात करोना बाधितांची एकूण संख्या ही २५ वर पोहचली असून प्रशासन चांगलेच हादरले आहे. दरम्यान, गुरुवारी तीन करोना संशयितांचा मृत्यू झाला होता. त्यातील १२ वर्षांच्या मुलासह दोघांचा अहवाल नकारात्मक आला.

दोन दिवसांपूर्वी सतरंजीपुरा येथील करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनाने मृताच्या कुटुंबातील सर्वाना मेडिकलमध्ये सक्तीने दाखल केले होते. मात्र मेयोतील करोना चाचणी करणारे पीसीआर यंत्र बिघडलेले असल्याने त्यांची करोना चाचणी उशिरा झाली. गुरुवारी मध्यरात्री त्यांचा अहवाल आला. अहवाल येताच प्रशासनाचे धाबे दणाणले. यातील सहा जणांना करोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यांना तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले  आहे. दाखल करण्यात आलेल्या करोनाबाधितांचे वय ८,१२,२१,३०,३४ आणि ३५ असून ते सर्व सतरंजीपुरा येथील रहिवासी आहेत. सध्या एकूण १०८ करोना संशयित दाखल  असून मेयोत ४६ तर मेडिकलमध्ये ६२ रुग्ण आहेत. २५ करोना बाधितांपकी १४ मेडिकल तर ११ मेयोत उपचार घेत आहेत. शुक्रवारी विलगीकरण केलेल्या संशयितांची संख्या १८ आहे.

‘त्या’ करोनाग्रस्ताला सुटी मिळाली

खामला परिसरातील करोनाग्रस्त आता बरा झाला असून शुक्रवारी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी मेयोतील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून निरोप दिला. यावेळी रुग्णाने देखील डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. याशिवाय अजूनही काही रुग्णांना सुटी होणार असल्याचे सूत्रांनी कळवले आहे. नागपुरात आतापर्यंत एकूण ४ व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत.