दोन दिवसांत सहा बाधित महिला आढळल्या;  शहरातील एकूण रुग्णसंख्या ३१५ वर

नागपूर : सर्वाधिक करोनाग्रस्त आढळणाऱ्या मोमीनपुरासह जवळपासच्या परिसरात आता गर्भवतींनाही करोना विषाणू विळख्यात घेत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांत येथील सहा गर्भवतींना विषाणूची बाधा असल्याचे पुढे आले.  यामुळे आरोग्य विभागात चिंता वाढली असून शहरातील एकूण बाधितांची संख्याही आता ३१५ वर पोहचली आहे.

गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती कमी असते. हल्ली नागपुरातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण मोमीनपुरा व सतरंजीपुरा परिसरात आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून या भागातील सर्व गर्भवतींची करोना चाचणी करणे सुरू केले आहे. त्यासाठी येथे  शिबीर घेऊन नमुने गोळा केले जातात. त्यामुळेच मोमीनपुरा परिसरात मंगळवारी तीन आणि बुधवारी तीन अशा दोन दिवसांत सहा गर्भवतींना बाधा असल्याचे निदान झाले. घरी असलेल्या सहापैकी दोन नऊ महिन्यांच्या गर्भवतींना मेयोत तर इतरांना मेयो- मेडिकलमध्ये दाखल केले गेले.

या महिलांवर मेयो प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यातच बुधवारी शहरात तीन गर्भवतींसह एकूण ११ जणांना विषाणूची बाधा असल्याचे निदान झाले. त्यात ६० आणि ७२ वर्षीय वृद्धेचाही समावेश होता. या सर्व रुग्णांमुळे शहरातील बाधितांची एकूण संख्या ३१५ वर पोहचली आहे. करोनाग्रस्त गर्भवतींची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून या भागात गर्भवतींच्या चाचण्या वाढवणार आहेत.  मेयोत यापूर्वी एक  नऊ महिन्यांची व त्यापूर्वी ४ महिन्यांची गर्भवती दाखल झाली होती. करोनामुक्त झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. गर्भवतींच्या प्रसूतीसाठी मेडिकल, मेयोत स्वतंत्र शस्त्रक्रिया गृहासह त्यांच्या बाळाला ठेवण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

अभिनव रुग्णालयाचा मदतनीसही बाधित

कमाल चौक परिसरातील अभिनव रुग्णालयाचा मदतनीसालाही करोनाची बाधा असल्याचे निदान झाले. मोमीनपुरा परिसरात राहणाऱ्या या २७ वर्षीय युवकाला तातडीने  मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून येथील डॉक्टर, परिचारिकांसह इतरही कर्मचाऱ्यांना मोठय़ा संख्येने विलगीकरण केंद्रात हलवल्याची सूत्रांची माहिती आहे.

करोनामुक्तांची संख्या १११ वर

मेडिकल, मेयोत यशस्वी उपचाराने करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बुधवारी मेयोतून ५ आणि मेडिकलमधूनही ५ अशा एकूण दहा जणांना करोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. त्यात २ वर्षीय मुलगा, ३ वर्षीय मुलीसह इतर वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.

मेडिकल, मेयोत २०२ बाधितांवर उपचार

मेडिकल आणि मेयो दोन्ही रुग्णालयांत एकूण २०२ करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक ११७ रुग्ण हे मेडिकलमध्ये दाखल असून इतर मेयोत उपचार घेत आहेत.  मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्यांत १०८ रुग्णांमध्ये करोनाचे एकही लक्षण नसून ९ रुग्णांमध्ये लक्षणे आहेत.