-लसींचा तुटवडा

-ज्येष्ठ नागरिकांचे हाल

नागपूर : शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी रविवारी महापालिकेच्या दहा झोनमधील दहा केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, त्यापैकी सहा केंद्र बंद होते. ज्या रुग्णालयाचे जाहीर केलेल्या यादीमध्ये नाव नव्हते ते सुरू होते आणि जे केंद्र सुरू असल्याचे जाहीर केले होते त्यातील सहा केंद्र बंद ठेवण्यात आल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागले. महापालिकेच्या या भोंगळ कारभारावर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

शहरात शनिवारपासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर महापालिकेद्वारे इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली.  मात्र शनिवारी सकाळी आयसोलेशन  केंद्रावर लस पोहोचली नव्हती. मात्र ११ नंतर लस पोहचल्यानंतर त्या ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आहे. पाचपावलीतील इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावलीतील रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आले मात्र त्या ठिकाणी लसीचा पुरवठ कमी असल्यामुळे केवळ तीनही केंद्र मिळून दिवसभरात २०० लोकांनाच लस देण्यात आली.

दरम्यान, रविवारी सकाळी ४५ वर्षांवरील नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना रविवारी सोमलवाडा, के.टी. नगर, मानेवाडा, बाबूलखेडा, ताजबाग, हंसापुरी, सतरंजीपुरा, पारडी, कपिलनगर आणि झिंगाबाई टाकळी या १० केंद्रांवर लस उपलब्ध राहणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्येक केंद्राला शंभर लस देण्यात आल्या होत्या, त्याही केंद्रावर पोहचल्या नसल्यामुळे येथे लस उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले. या संदर्भात सोमलवाडा व के.टी नगर येथे विचारणा केल्यानंतर अजूनपर्यंत लसीचा साठा आला नसल्याचे तेथील एका कर्मचाऱ्याने सांगितले. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र येथे सुद्धा ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू  राहणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र या ठिकाणी  लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे अनेक लोकांना परत जावे लागले.

४५ वरील नागरिकांचे आज लसीकरण  नाही

शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे उद्या, सोमवारी महापालिकेच्या सर्व केंद्रांवर लसीकरण होणार नाही, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली. लसीचा निर्माण झालेला तुटवडा बघता लसीकरण होणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण महापालिकेद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहील.