News Flash

हरतालिका पूजेसाठी गेलेल्या महिलेसह ६ जणींचा बुडून मृत्यू

या दुर्घटनेस बंधारा कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी शवविच्छेदनास नकार दिला.

हिंगणा तालुक्यातील दुर्घटना

हरतालिका पूजेसाठी बंधाऱ्यावर गेलेल्या एका महिलेसह पाच तरुणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी हिंगणा तालुक्यातील सावंगी देवली येथे घडली.

या दुर्घटनेस बंधारा कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी शवविच्छेदनास नकार दिला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. मंदा नत्थूजी नागोसे (५०) या महिलेसह जान्हवी ऊर्फ जनू ईश्वर चौधरी (१३), पूनम तुळशिराम डडमल (१७), पूजा रामरतन डडमल (१७), प्रणिता शंकर चामलाटे (१७) आणि प्रिया रामप्रसाद राऊत (१८) अशी मृत मुलींची नावे आहेत. हरितालिका पूजेसाठी मंदा नागोसेसह या मुली गावाजवळच्याच एका बंधाऱ्यावर गेल्या. पूजा सुरू असताना एक मुलगी पाण्यात उतरली. बंधाऱ्याच्या पाण्यातील एका मोठय़ा खड्डय़ाचा अंदाज न आल्याने ती त्यात पडून बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी गेलेली दुसरी मुलगीही बुडाली. एकमेकांना वाचविण्यासाठी गेलेल्या इतर मुलींबरोबरच महिलाही बुडाली. त्यांच्यासोबत आलेल्या दोन लहान मुलांनी मदतीसाठी धावा करत ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी घर गाठले. मात्र, ग्रामस्थ घटनास्थळी येण्याआधीच या सहा जणींचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली. आपत्ती व्यवस्थापनासह हिंगणा पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस अधिकाऱ्यांसह विविध अधिकारीही पोहोचले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची तयारी सुरू असताना संतप्त गावकऱ्यांनी या बंधाऱ्यात निष्काळजीपणे खड्डा खोदून तो न बुजवलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करून मृतदेह घटनास्थळीच रोखून धरले. पालकमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. अखेर जमावाने नमते घेत शवविच्छेदनाला परवानगी दिल्याने सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

चौकशीसाठी समिती

ही घटना दु:खद असून नागपूर जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या या बंधाऱ्याची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामाची चौकशी केली जाईल. काम सुरू करताना व काम झाल्यावर कंत्राटदाराने या ठिकाणाची छायाचित्रे संकेतस्थळावर टाकलेली नव्हती. या प्रकरणात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती स्थापन केली असून बुधवापर्यंत त्यांचा अहवाल मिळेल. त्यात कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 4:52 am

Web Title: six women from nagpur drown in a river while offering prayers
Next Stories
1 पतंजलीचा फूड पार्क : भूमिपूजनाला बाबा रामदेव येणार
2 पक्षविरोधी कारवाई करणारे नगरसेवक शिवसेनेत परतले
3 पोलीस हवालदाराला लाच घेताना अटक
Just Now!
X