गाळे विक्रीसाठी २५ लाखांनी फसवणूक

नागपूर : शिवसेनेचा निलंबित शहर प्रमुख खंडणीखोर मंगेश कडव याच्याविरुद्ध आज शनिवारी बजाजनगर पोलीस ठाण्यात सहावा गुन्हा दाखल करण्यात आला. बजाजनगरच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये दोन गाळे मिळवून देण्यासाठी त्याने एकाची २५ लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

अजय बाबुराव शेंदरे रा. पारशिवनी यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीचे त्याच्याविरुद्ध सक्करदरा, हुडकेश्वर, अंबाझरी, बजाजनगर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक, खंडणी मागणे, धमकावण्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. शेंदरे यांना नागपुरात दुकानाकरिता दोन गाळे घ्यायचे होते. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये दोन गाळे विक्रीसाठी शेंदरे यांच्याकडून कडवने २५ लाख रुपये घेतले. शेंदरे यांनी २५ लाख रुपये आरटीजीएसद्वारा त्याला दिले. दोन वर्षांपासून त्याने गाळयांचे विक्रीपत्र करून दिले नाही व पैसेही परत केले नाही. शेवटी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात सहावा गुन्हा दाखल केला.