कारखानदार व भूमिपुत्रांसाठी नामी संधी

नागपूर : मजूर, कामगारांच्या स्थलांतरणानंतर उद्योग व कारखान्यांना निर्माण झालेली कुशल मनुष्यबळाची गरज बघता राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाने टाळेबंदीच्या काळात स्थानिक कुशल मनुष्यबळाची यादी एका अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली आहे. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्यासाठी कोठे काम उपलब्ध आहे याची तर कारखानदारांना कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ हवे याची माहिती

एका क्लिकवर या अ‍ॅपद्वारे मिळणार आहे.

करोनामुळे देशभर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद करण्यात आले. त्यामुळे तेथे काम करणारे सर्व परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात परत गेले. नागपूरही त्याला अपवाद नाही. आता नव्याने उद्योग, कारखाने सुरू करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन या विदर्भातील उद्योजकांच्या संघटनेने नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन मनुष्यबळ उलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कौशल्य विकास विभागाला  यासंदर्भात वेगळा अ‍ॅप तयार करण्यास सांगितले. विभागाने आता महास्वंयम नावाचा  एक अ‍ॅप तयार केले असून त्यावर  कुशल व अकुशल सर्वच प्रकारच्या मनुष्यबळाची माहिती उपलब्ध आहे. नागपूर जिल्ह्य़ात दोन लाख आठ हजार बेरोजगार तरुणांनी  जानेवारीपर्यंत विभागाकडे नोंदणी केली असून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सर्व माहिती उपलब्ध आहे. जिल्ह्य़ात कोणत्या गावात, तालुक्यात किती मनुष्यबळ  आहे हे सुद्धा यावर नमुद करण्यात आले आहे, असे  कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी सांगितले. या अ‍ॅपमुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ तर तर बेरोजगारांना रोजगार संधी याची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. टाळेबंदीसारख्या अडचणीच्या काळात कौशल्य विकास विभाग उद्योजकांना पाहिजे तेवढे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ शकतो. उद्योगांनीही आमच्याकडे मागणी करावी, अशी सूचना केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही अ‍ॅपचे सादरीकरण करून दाखवण्यात आले. त्यानंतर  व्हीआयए आणि बुटीबोरी मॅनिफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांनही  अ‍ॅपची माहिती देण्यात आली तसेच महास्वंयम या संकेतस्थळाला भेट देण्याची विनंती करण्यात आली, असे  हरडे म्हणाले.

‘महास्वयंम’ला भेट द्या

महास्वंयम हे कौशल्य विकास विभागाचे संकेतस्थळ असून त्यावर फक्त नागपूरच नव्हे तर राज्यभरातील विविध क्षेत्रातील रोजगार संधी आणि उपलब्ध मनुष्यबळाची जिल्हानिहाय माहिती उपलब्ध आहे. उद्योग, कारखानदार या संकेतस्थळाला भेट देऊन स्थानिक पातळीवर  उपलब्ध कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करू शकतात, असे कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे म्हणाले.