आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन
नागपूर : बेघरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेले निवारा केंद्र आता बेघरांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे केंद्र ठरत आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेच्या काळजीसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. शहरातील रस्ते, फुटपाथवर राहणाऱ्या या बेघरांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेद्वारे टाळेबंदीचा अभिनव फायदा करून घेतला आहे.
महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून आयुक्तांच्या पुढाकाराने नियमित निवाऱ्यासोबतच तात्पुरत्या शहरी बेघर निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या शहरातील विविध भागातील एकूण २० बेघर निवाऱ्यात १२५२ जणांनी आसरा घेतला असून महापालिकेतर्फे चहा, नाश्ता व दोन वेळच्या संपूर्ण भोजनाचीही मोफत सोय तेथे करण्यात येत आहे. पोटाची भूक भागवताना या बेघरांच्या संपूर्ण सुरक्षेचीही पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. आधी या बेघरांची अवस्था केस वाढलेले, मळकट कपडे, मळलेले शरीर अशी होती. निवारा केंद्रामध्ये आणल्यानंतर त्यांना स्वतच्या आरोग्याची काळजी घेणे शिकविण्यात आले. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून या बेघरांसाठी नवीन कपडे देण्यात आले आहेत. आयुक्तांची संकल्पना आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून या बेघरांचे पूर्णत: ‘मेक ओव्हर’ झाले आहे.
अन्न आणि स्वच्छतेसह या बेघरांच्या कौशल्यांकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना आत्मनिर्भर करून टाळेबंदीनंतर त्यांना सक्षमतेने जीवन व्यतित करता यावे यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसित केले जात आहे. या बेघरांना वेगवेगळे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी सुतार कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे फलित म्हणजे सर्व प्रशिक्षणार्थ्यांकडून सुंदर स्वरूपाचे पक्ष्यांचे घरटे तयार झाले. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना दिलासा देण्याऱ्यांमध्ये आता या बेघरांचेही हात पुढे आले आहेत. याशिवाय पाककलेच्या प्रशिक्षणात सर्वानी जलेबी सुद्धा बनविली. संपूर्ण निवारे मिळून एकूण १५९१ इतकी क्षमता आहे. यामध्ये सध्या १२५२ नागरिकांनी आसरा घेतला आहे.
टाळेबंदीमध्ये बेघरांची दुरवस्था होऊ नये यासाठी महापालिकेने त्यांची व्यवस्था निवारा केंद्रात केली. आता त्यांच्या कौशल्य विकासाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यातील कौशल्य शोधून त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. जेणे करून पुढे ते दुसऱ्यांवर निर्भर न राहता ते स्वयंसक्षमतेने जीवन जगू शकतील.
– तुकाराम मुंढे, आयुक्त , महापालिका.
योगा, टीव्ही, कॅरमची सुविधा
निवारागृहातील लोकांना किती दिवस तेथे थांबावे लागणार आहे, हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे या लोकांसाठी पोलिसांकडून अनेक सोयी करण्यात येत आहेत. त्यांना करमणुकीची साधने उपलब्ध करून देण्यात येत असून सकाळी योगा करवून घेण्यात येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरात अशी १९ निवारागृहे असून त्यात ५ हजार लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणच्या लोकांना करमणुकीसाठी पोलिसांकडून सकाळी योगा करविण्यात येते. त्यानंतर तेथे दूरचित्रवाणीची व्यवस्था करण्यात आली असून कॅरम, बॅडमिंटनची व्यवस्था करून देण्यात आली आहे. याचे समन्वये अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी हे करीत असून व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्याकडे आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 3:26 am