30 September 2020

News Flash

२१ झोपडपट्टय़ांमध्ये करोनाचा शिरकाव

मार्चमध्ये टाळेबंदीदरम्यान झोपडपट्टीवर लक्ष केंद्रित करून लोकांनी बाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली होती.

 

संसर्ग रोखण्याचे आव्हान; र्निजतुकीकरणावर भर

नागपूर : शहरात करोनाबाधितांची वाढती संख्या बघता काही दिवसात उच्चभ्रू वस्तीसोबत २१ झोपडपट्टी परिसरात करोनाने शिरकाव केला आहे. यामुळे महापालिकेसमोर संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सुरुवातीला सतरंजीपुरा, मोमीनपुरा, गोळीबार चौक, मध्यवर्ती कारागृह, जागनाथ बुधवारी आदी परिसर हॉटस्पॉट झाले होते. मात्र गेल्या महिनाभरात टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर बाधितांची संख्या वाढली आहे. परिणामी, विविध भागातील झोपडपट्टीतही करोनाने शिरकाव केला आहे. शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या नंदनवन गुलशननगर, सूर्यनंगर, भानखेडा, गंगाबाई घाट शिवाजीनगर, काचीपुरा, शांतीनगर, डिप्टी सिग्नल, भांडेवाडी, नंदनवन, डिप्टी सिग्नल, पारडी, वाठोडा, जयताळा, पांढराबोडी, कृष्णानगर, शीलानगर, रमाईनगर, सिरसपेठ, बजरंगनगर, पँथरनगर  झोपडपट्टी, इंदिरा गांधी नगर झोपडपट्टी, कृष्णानगर, कुशीनगर, गुलशननगर, पिवळी नदी ओव्हर ब्रीज, चांभार नाल्याजवळील परदेशी मोहल्ला, डोबीनगर, खदान, इंदिरा गांधी नगर, लष्करीबाग, बंदेनवाजनगर, विनोबा भावे नगर, न्यू मंगळवारी, शांतीनगर, राहुलनगर या झोपडपट्टय़ांमध्ये बाधित आढळलेत. पूर्व नागपुरातील नंदनवन झोपडपट्टीत दोन बाधित महिला आढळल्या असून त्या अनेक ठिकाणी घरकामासाठी जात असल्याचे समोर आले आहे. गुलशन नगर परिसरातील झोपडपट्टीत दोन रुग्ण आढळले.

मार्चमध्ये टाळेबंदीदरम्यान झोपडपट्टीवर लक्ष केंद्रित करून लोकांनी बाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली होती. मात्र, टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर मोठय़ा प्रमाणात घरकाम करणारे किंवा कामगार घराबाहेर पडू लागले. यामुळे तेथे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाने आता दोनपेक्षा जास्त रुग्ण असलेल्या परिसरावर लक्ष केंद्रित केले असून र्निजतुकीकरण केले जात आहे. शिवाय परिसर कठडे लावत परिसर बंद केले जात आहे. मात्र तेथे सुरक्षारक्षक नसल्यामुळे लोक कठडे बाजूला सरकवत बाहेर पडत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात झोपडपट्टय़ामध्ये बाधितांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे.

झोपडपट्टीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी झोनपातळीवर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शिवाय दर दोन दिवसांनी र्निजतुकीकरण केले जात असून लोकांमध्ये जागृती केली जात आहे. ज्या झोपडपट्टीत रुग्ण आढळले तेथील आजूबाजूच्या लोकांचे नमुने घेण्यात आले असून त्यातील काहींना विलगीकरणात पाठवले आहे.

– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 2:30 am

Web Title: slum area entry corona virus akp 94
Next Stories
1 करोनाग्रस्ताच्या घरातील र्निजतुकीकरणामुळे चोरीच्या तपासाचा पेच!
2 ‘कोविड केअर सेंटर’ला तपासणी कधी होणार?
3 बारावी नापासांची फेरपरीक्षेची संधी हुकणार?
Just Now!
X