समाजातील अनेक निराधार, बेवारस आणि मनोरुग्ण असलेल्या व्यक्ती शहरातील विविध भागात दिसतात, मात्र त्यांच्याकडे कोणाला बघायला वेळ नसतो. मनोरुग्ण किंवा शरीराने जर्जर होऊन रस्त्यावर बेवारस असलेल्या गोरगरीब व्यक्तीकडे कोणी पहात नाही आणि त्याला सहाय्यही करीत नाही. मात्र माणुसकीला जपण्याचे काम ‘स्माईल प्लस’ ही सामाजिक संघटना गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात करत आहे. निराधार किंवा मनोरुग्णांचा आधार असलेला ‘स्माईल प्लस’ सोशल फाऊंडेशन आज रस्त्यावरील मनोरुग्णांचा आधार झाला असून त्याच्या जीवनात हास्य फुलवण्याचे काम करीत आहे.

‘स्माईल प्लस’ या संस्थेचे संस्थापक योगेश मालधरे असून त्यांनी शहरातील विविध भागात निराधारांना आधार देण्याचे काम करीत आहे. नागपूर शहरात गेल्यावर्षी १९ नोव्हेंबरला या संस्थेची स्थापन करण्यात आली. बीडपेठ भागात असलेल्या महापालिकेच्या शाळेत ‘माणुसकी निवारा’ म्हणून केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात १० खाटा असून त्या ठिकाणी या निराधाराची किंवा मनोरुग्णांची सोय केली जाते आणि त्यानंतर मनोरुग्णांना मनोरुग्णालयात पाठवले जाते.

राज्यभर निराधाराना आश्रय देणारी ‘स्माईल प्लस’ संघटना आहे. गेल्या १६ महिन्यात ३८० जणांना आधार दिला असून त्यापैकी ४० जणांना त्यांच्या घरी पोहचवले आहे. शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या निराधार किंवा बेवारस स्थितीत पडलेल्या व्यक्तीचा शोध घेत असतो आणि त्याला सुरुवातीला शासकीय रुग्णालयात घेऊन जात असतो आणि त्यानंतर ‘माणुसकी निवारा’मध्ये घेऊन येतो. शहरात पंधरा ते वीस युवक यात काम करीत आहे, असे नागपूर केंद्राचे व्यवस्थापक सुमंत ठाकरे यांनी सांगितले.

रस्त्यावर पडलेल्या मनोरुग्णांना रुग्णालयापर्यंत घेऊन जाणे, त्यांना आयुष्याच्या उकिरडय़ातून माणसांत आणणे हे सोपे काम नव्हते. त्यासाठी जिगर लागते. केवळ मनोरुग्णांची सेवा करायची नाही तर त्यांच्या परिवाराचा काही थांगपत्ता लागला तर त्याला घरी पाठवणे आणि त्याला घर मिळाले नाही तर बेवारस सोडण्यापेक्षा मानसिक रुग्णांना एखाद्या आश्रमात किंवा मनोरुग्ण असलेल्या मानसिक रुग्णालयात दाखल करण्याचे काम ‘स्माईल प्लस’ फाऊंडेशनच्यावतीने केले जाते.

रस्त्यावर पडलेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात नेऊन ‘स्माईल प्लस’चे युवक काम करीत असतात. मालधरे यांचे पश्चिम महाराष्ट्रात काम सुरू असताना नागपुरातील युवकांनी प्रेरणा घेऊन त्यांचे काम सुरू केले आहे. ‘माणुसकी निवारा’चे प्रमुख रमा मालखरे आहे तर सुमंत ठाकरे नागपूर विभागाचे काम पहात असून तो व्यवस्थापक आहे तर केतन केवलिया, स्वप्नील उर्माले, विवेक देशमुख, अंकुश फुसे, राहुल कुंभलकर, प्रसाद जुगादे, गगन चौबे, स्नेहा प्रधान, मिनल ठाकरे आदी काम करीत आहे. अधिक माहितीसाठी योगेश मालखरे ८६०००००८०६ आणि सुमंत ठाकरे ८८८८७३३०३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.