04 March 2021

News Flash

सार्वत्रिक टीकेनंतर संघाकडूनच संरक्षक भिंत बांधकामाला नकार?

सुरक्षा भिंतीवर ४८ लाख ३६ हजार ५४ रुपये, तर रस्त्यासाठी ८९ लाख २ हजार ७९० रुपये खर्च येणार होता.

संग्रहित छायाचित्र

स्मृती मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण

संघाच्या रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील सुरक्षा भिंत आणि सिमेंटचा रस्ता बांधण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने आता संघानेच या प्रस्तावाला नकार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे आम्ही संघासाठी काही करतो हे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांवर पुन्हा एकदा नामुष्कीची वेळ येण्याची चिन्हे आहेत.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात सुरक्षा िभत आणि सिमेंट रस्ता बांधकामाच्या १.३७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली होती.

सुरक्षा भिंतीवर ४८ लाख ३६ हजार ५४ रुपये, तर रस्त्यासाठी ८९ लाख २ हजार ७९० रुपये खर्च येणार होता. चालू आर्थिक वर्षांत महापालिकेने ४८ लाख ३६ हजार रुपयाची तरतूद बाळासाहेब देवरस पथ त्रिवेणी स्मारकासाठी व हेडगेवार स्मृती मंदिर परिसर सौंदर्यीकरणासाठी केली होती.

ही रक्कम सुरक्षा या भिंतीसाठी खर्च करण्यात येणार होती. महापालिकेच्या निधीतून सार्वजनिक उपयोगितेची कामे करणे बंधनकारक असताना एका संस्थेच्या कामासाठी निधी खर्च केला जात असल्याने विरोधी पक्ष काँग्रेस आणि सामाजिक संघटनांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली होती.

माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे संघाची प्रतिमा मलीन होत होती. ही बाब लक्षात घेऊन आता संघानेच या कामाला नकार देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

संघाच्या महानगर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव संघाचा नाही, भाजप नेत्यांनी तो दिला होता व महापालिकेने त्याला मंजुरी दिली, असे संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने त्यांचे नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

यापूर्वी उंटखाना भागातील महापालिकेची शाळा सरसंघचालकाच्या सुरक्षा रक्षकांचा निवासासाठी देण्याच्या प्रस्तावाला विरोध झाला होता. त्यानंतर तो मागे घेण्यात आला होता. हे येथे उल्लेखनीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 1:57 am

Web Title: smruti temple nagpur beautification issue nagpur municipal corporation nagpur court
Next Stories
1 एक हजार मुलांमागे ८ जणांच्या ह्रदयाला छिद्र
2 लोकजागर : शिकार कुणाची? वाघाची की आदिवासींची?
3 शिष्यवृत्ती घोटाळ्याचा ठपका अधिकाऱ्यांना अमान्य
Just Now!
X