• काँग्रेसच्या दोन नगरसेवकांची वीज कापली
  • धास्तीपोटी भाजप सदस्यांकडून वीज बिलाचा भरणा
  • बंटी शेळकेंच्या घरी एसएनडीएल कर्मचाऱ्यांना मारहाण
  • भाजप नगरसेवकांच्या थकबाकींवर शिक्कामोर्तब

‘एसएनडीएल’ने भाजप आणि काँग्रेसच्या वीज थकबाकीदार आजी-माजी नगरसेवकांवर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके आणि कमलेश चौधरी यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. शेळके यांच्या घरी कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. दरम्यान, कारवाईमुळे घाबरलेल्या भाजपच्या थकबाकीदार नगरसेवकांनी वीज देयक भरणे सुरू केले. विशेष म्हणजे, त्यांच्या थकबाकींवर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘एसएनडीएल’चे पथक बुधवारी सकाळी नगरसेवक बंटी शेळके यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथील मीटर आर. जे. शेळके या नावाने आहे. त्यांच्याकडे दोन लाख ५६ हजार ३३१ रुपये थकित होते. त्यांना देयकं भरण्याची विनंती केली. मात्र, शेळके कुटुंबीयाने ती फेटाळल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कारवाई दरम्यान बाबा शेळके यांनी पथकातील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली.पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, दुसऱ्या पथकाने नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरची वीज कापली. तेथील मीटर दिलीप चौधरी यांच्या नावे असून त्यांच्याकडे एक लाख ५२ हजार ८३० रुपयांची थकबाकी आहे.

तिसरे पथक भाजपच्या नगरसेविका सुषमा चौधरी राहत असलेल्या पवनसुत सोसायटी, नारा रोड, जरीपटका येथील एका घरी गेले. त्यांच्यावर एक लाख ९८ हजार ८२२ रुपयांची थकबाकी होती. मीटर सदोष असल्याने नवे लावून द्यावे, दोन्ही मीटरचे रिडिंग योग्य आल्यावर देयक अदा करण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिले. एसएनडीएलने नवीन मीटर लावले. सायंकाळी दोन्ही मीटरचे रिडिंग सारखे आल्याने तेथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला नाही. त्यामुळे कारवाई करताना पक्षपात केला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

दरम्यान, कारवाईची माहिती होताच इतरही पक्षांच्या थकबाकीदार नगरसेवकांनी तातडीने देयक भरणे सुरू केले. भाजपचे दीपक वाडीभस्मे- १०,३३० रुपये, शेषराव गोतमारे- सहा हजार, ४५० रुपये, रिता मुळे- दोन हजार सातशे, जगदीश ग्वालवंशी- पाच हजार पाचशे, स्नेहल बिहाडे- तीन हजार १२० रुपये अशी देयके अदा केली. काँग्रेसचे संजय महाकाळकर- चार हजार, ९९० रुपये, आशा उईके- पाच हजार ५० रुपये यांच्यासह बसपाचे श्यामराव बुर्रेवार यांनीही १३,६७० रुपयांचे थकीत वीज देयक भरले आहे. भाजपच्या नगरसेवकांनी थकीत देयके भरणे सुरू केल्याने त्यांच्यावर देयकांची थकबाकी असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजपच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह

भाजपच्या नगरसेवकांवर वीज देयकाची थकबाकी नसतानाही एसएनडीएलने चुकीची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली म्हणून भाजप नेते व माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी एसएनडीएल कार्यालयात तोडफोड केली होती. या प्रकरणात पोलिसांनी केवळ अदाखलपात्र गुन्हे नोंदवले आहे. मात्र, आज झालेल्या कारवाईमुळे भाजप नगरसेवकांनी देयक थकवली असल्याचे स्पष्ट झाले.

एसएनडीएलची बँक हमी गोठवली

एसएनडीएलकडे थकबाकी वाढल्याचे महावितरणने त्यांची १० कोटींची बँक हमी थकीत वीज देयकाच्या रक्कमेत वळती करण्यासाठी गोठवली. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांनी थकबाकीदार भाजप नगरसेवकांच्या विषयावर एसएनडीएल आणि महावितरणसोबत बैठक घेतली होती. त्यात एसएनडीएलला सूचना दिल्यावरही त्याचे पालन न झाल्याने ही कारवाई झाल्याची जोरदार चर्चा आहे.

एसएनडीएल ग्राहकांमध्ये भेद करीत नाही. थकबाकीदारावर कारवाई केली जाते. बुधवारी आर.जी. शेळके, दिलीप चौधरी यांच्या नावे असलेल्या मीटरमधून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अनिल दादवराव चौधरी यांच्या नावे दोन लाखावर थकबाकी आहे. त्यांनी सुमारे ३० हजार रुपये गुरुवारी देण्याचे मान्य केले. त्यामुळे त्यांना एक दिवसाची मुदत देण्यात आली.

एसएनडीएल, जनसंपर्क विभाग, नागपूर