नागपूर : दर पाच वर्षांनी सरकार येते आणि जाते. त्यामुळे सामाजिक संस्थांनी सरकारवर अवलंबून न राहता स्वत:चे कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी केले.

विदर्भ संशोधन मंडळाने संशोधन क्षितिज विशेषांक प्रकाशन सोहळा धंतोली येथील देवी अहिल्या मंदिरातील दांडेकर सभागृहात सोमवारी आयोजित केला होता. याप्रसंगी डॉ. भागवत बोलत होते. विदर्भ संशोधन मंडळाचे अध्यक्ष  मदन कुलकर्णी समारंभाच्या अध्यक्षस्थानी  होते.

मदन कुलकर्णी यांनी मंडळाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडून  भागवत म्हणाले की, ज्यांना सरकारकडे आर्थिक मदतीसाठी  बोलायचे असेल, त्यांनी जरूर बोलावे. परंतु त्यांनी सरकारवर अवलंबून राहावे, असे मला वाटत नाही. कारण सरकार बदलत असते. पूर्वी २० वर्षांनी, ३० वर्षांनी राजवटी देखील बदलायच्या. आता तर दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची शक्यता असते. तेव्हा जोपर्यंत सरकार आहे, तोपर्यंत त्याचा उपयोग करून घ्या. पण, संस्थेने भक्कम आणि स्थायी उत्पन्नाचा आधार उभा केला पाहिजे. तो सामाजिक आधारावर निर्माण होऊ शकतो.

संशोधन आणि ज्ञानाबाबत ते म्हणाले की, सर्व संशोधनाचे प्रवर्तक ऋषीच आहेत. संशोधनाचा उद्देश ज्ञान प्राप्त करणे आहे. ज्ञानामुळे मुक्तीचा मार्ग सापडतो. त्यामुळे ज्ञानी मनुष्य खरा बोलत असतो. जे आहे ते निर्भयतेने सांगतो. राज्यकर्त्यांना देहांत प्रायश्चित द्यायला तो कमी करीत नाही. तो गुळमुळीत असे काही करीत नाही, तो स्पष्ट सांगत असतो. सत्य बोलण्याची त्याला भीती नसते. सत्य बोलल्यामुळे राज्यकर्त्यांची पंचाईत होते. त्यामुळे दंडेली करून सत्याचा आवाज कमी करण्याचा प्रयत्न असतो. हे प्रयत्न काही काळ यशस्वी झाले तरी, अखेर  सत्य हे सत्यच असते. संशोधनाचा आणि ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी व्हायला पाहिजे. नाहीतर तो भस्मासुर ठरतो. ब्रिटिशांनी ज्ञानाचा उयोग करून जातनिहाय गणना केली, पण त्यांचा हेतू चुकीचा होता. त्यामुळे ब्रिटिशांना महर्षी  म्हणावासे वाटत नाही, असेही ते म्हणाले.