अनेक समस्या निवृत्तीनंतर भेडसावतात

सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा वाली कुणीच नसताना महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन ती जबाबदार पार पाडत आहे. या संस्थेंतर्गत जुळलेले अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक दायित्व पार पाडत आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश मेहता यांनी २००४ मध्ये या संघटनेची स्थापना केली. सेवाकाळात पोलिसांना संघटना स्थापना करण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांच्या समस्यांचाही कोणी वाली नसतो. निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन आणि इतर लाभ मिळविण्यासाठी अनेक कार्यालयात अर्ज करावे लागते. अनेकांना त्याची माहिती नसते. त्यामुळे ही संस्था त्यांना मार्गदर्शन करते. सेवेत असताना मृत पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनाही विविध लाभ मिळविण्यासाठी संस्थेतर्फे मदत करण्यात येते. पोलीस १२ ते १५ तास नोकरी करतात. सेवाकाळात रात्रपाळी आणि उन्ह पावसात सेवा देतात. रस्त्यांवर उभे असताना प्रदूषणाचा विचार करीत नाही आणि त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. सेवेत असताना मोफत आरोग्य सुविधा मिळतात. मात्र, निवृत्तीनंतर ती सेवा उपलब्ध नसल्याने विविध आजारांशी झगडताना पोलिसांची आर्थिक बाजू कमकुवत होते. त्यामुळे संस्था केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांप्रमाणे पोलिसांनाही निवृत्तीनंतर मोफत किंवा सुटीच्या दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून करीत आहे. यावर अद्याप राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. मात्र, नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘पॉलिक्लिनिक’मध्ये अशा कर्मचाऱ्यांना मोफत सल्ला व सुटीच्या दरात आरोग्य तपासण्या करण्याची सुविधा देण्याची ग्वाही पोलीस महासंचालक सतीश माथूर व आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे. याचा फायदा संस्थेशी जुळलेल्या जवळपास ३०० सदस्यांसह इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होईल. त्याशिवाय ही संस्था निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबीर भरवत असून समूह आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावते. आर्थिक परिस्थितीमुळे निवृत्तीनंतर अनेकांना कामाची गरज असते. अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांना मिहान, मेट्रो, महाराष्ट्र सुरक्षा दलमध्ये भरती होण्यासाठी संस्थेतर्फे सहकार्य करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश मेहता, सचिव सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त सुरेश महाले, आणि सहसचिव सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक नागेश घोडकी यांनी दिली.

पोलीस मुलांना भरती पूर्व प्रशिक्षण

त्याशिवाय पोलीस मुलांकरिता भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबवण्याचे काम करण्यात येते. पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये तरुण पोलिसांना गुन्ह्य़ांचा तपास, न्यायसहाय्यक विज्ञान आदींचे मार्गदर्शन करणे, त्याकरिता विविध मार्गदर्शक वर्ग आयोजित करण्याचे काम संस्था करते. त्याशिवाय समाजातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागली ती मदत करणे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देणे आदी उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात.