शहरातील विविध भागातील फूटपाथवर अनेक कुटुंब उघडय़ावर आयुष्य जगताना त्यांच्यासोबत त्यांची मुले राहत असतात. ही लहान मुले त्या त्या भागातील चौकातील सिग्नलवर भीक मागत असतात. अशा फूटपाथवर जीवन जगणाऱ्या आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून ‘उपाय’ नावाची संस्था काम करीत आहे. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा अशा भटक्या आणि फूटपाथ किंवा रस्त्यावर जीवन जगणाऱ्या मुलांना एकत्र आणून त्यांना शिक्षणासोबत संस्कार देण्याचे काम या संस्थेच्यावतीने केले जात आहे.

मौदा येथील एनटीपीसीजवळील आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या आणि आर्थिकदृष्टय़ा कमजोर असलेल्या कुटुंबातील मुलांना त्या भागात शिक्षणाची कुठलीच सोय नसल्यामुळे आणि तशी त्या लोकांची आर्थिक स्थिती नसल्यामुळे तेथील मुले रस्त्यावर दिवसभर हुंदडत जीवन जगत होती. खडकपूर येथून आयआयटी करून एनटीपीसीमध्ये कामाला असलेल्या वरुण श्रीवास्तव यांनी त्या भागातील रस्त्यावरील भटकणाऱ्या मुलांची दशा बघितली आणि त्यांनी त्या भागात १५ मुलांना सोबत घेऊन त्यांना शिक्षण देणे सुरू केले. केवळ शिक्षण नाही त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे, या दृष्टीने त्यांनी स्वत: जवळचा पैसा खर्च करीत मुलांना वेगवेगळ्या शैक्षणिक वस्तूचे वाटप करीत त्यांना शिक्षण देणे सुरू केले. कालांतराने ही शिक्षणाची गंगा एका छोटय़ा भागातून सुरू झाल्यानंतर श्रीवास्तव यांच्या या उपक्रमाशी अनेक युवा शिक्षित जोडले गेले आणि त्यातून युवकांची मोठी चमू तयार झाली आणि त्यांनी २०११ मध्ये नागपुरातील फूटपाथवर जीवन जगणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या आईवडिलांच्या भेटी घेतल्या आणि ज्या ठिकाणी ते राहतात, त्याच ठिकाणी शाळा सुरू केली आणि आज शहरातील विविध भागातील फूटपाथवर या मुलांच्या शाळा भरवल्या जात असून त्यांना ‘उपाय’ या संस्थेचे कार्यकर्ते शिक्षणासोबत संस्काराचे धडे देत आहेत.

खरे तर फूटपाथवरील मुलांचे शिक्षणदाता बनण्याचे आवाहन ‘उपाय’ या सामाजिक संस्थेने स्वीकारल्यानंतर कोणाची मदत घेतली नाही. या उपक्रमात सहभागी झालेल्या युवकांनी पैसा गोळा करायचा आणि त्या मुलांना हवे ते शैक्षणिक साहित्य खरेदी करून देण्यात आले. या माध्यमातून शिक्षणाची आवड असूनही ज्ञानगंगेपासून वंचित असलेल्यांना या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करण्यात आली. या संकल्पनेला समाजातील संवेदनशील लोकांची मदतीची गरज असल्यामुळे अनेक लोक जोडत गेली. कधी पाच मुले तर कधी पंधरा यात सहभागी होत असतात. साधारण शहरातील सिग्नलवर भीक मागणारी जी मुले असतात, त्यांना पैसे मागण्याच्या सवयी लागू नये, यासाठी त्यांच्या पालकांचे सुद्धा मार्गदर्शन ही ‘उपाय’ची चमू करीत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून शंभरपेक्षा अधिक रस्त्यावर भीक मागणारी मुले शाळेत जाऊ लागली आहेत. उपाय संस्थेच्या माध्यमातून नागपुरात ९ केंद्र सुरू आहेत. या अंतर्गत फूटपाथवरील ५५० मुलांना शिक्षण दिले जात आहे. आडजघडीला २५० स्वयंसेवक यासाठी कार्यरत आहे. या मुलांच्या संपूर्ण विकासासाठी एक निवासी स्वरूपाचे चाईल्ड वेलफेअर सेंटर सुरू करण्याचा संस्थेचा मानस असून त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे.

फूटपाथ किंवा रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असून यात आता शेकडो हात जुळले आहे. आर्थिक परिस्थितीने ही मुले समाजात उपेक्षित असली तरी या उपेक्षितांना आधार देणारी संवेदनशील माणसे बरीच आहेत आणि त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. या मुलांचे शिक्षणदाता होण्यासाठी संस्थेने ‘स्पॉन्सर अ चाईल्ड’ हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत मुलांवरील शिक्षणाचा जेवणाचा खर्च उचलावा.     – वरुण श्रीवास्तव, संस्थापक, उपाय