सामाजिक कार्यकर्त्यां अरुणा सबाने यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आज घर, शाळा, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणीही महिला सुरक्षित नाहीत. सीताबर्डीतील फ्रेन्ड्स या कापड विक्रीच्या दुकानात उघडकीस आलेल्या घटनेतून हीच बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सहा महिन्यांच्या चिमुकलीपासून ते ८० वर्षांच्या वृद्ध महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत असून ही अवस्था म्हणजे आपली सामाजिक अधोगती होय, असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्यां अरुणा सबाने यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या.

अरुणा सबाने म्हणाल्या, दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. देशाची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून पुन्हा मनुस्मृतीचे राज्य येते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. घरी बाल वयापासून महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येतात. सहा महिन्यांच्या मुलीपासून ते ८० वर्षांच्या म्हातारीलाही विकृत मानसिकतेचे लोक आपल्या वासनेची शिकार बनवतात. शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतागृहे, कामाची ठिकाणे आणि कापडे विक्रीचे दुकान अशा सर्वच ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण  होत आहे. अत्याचाराचे प्रमाण खूप मोठे आहे. पण, केवळ काही महिला व मुलीच समोर येऊन तक्रार करतात. बहुतांश महिला व मुली बदनामीच्या भीतीने मूग गिळून अत्याचार सहन करीत असतात. महिलांवरील अत्याचारासाठी अशिक्षितपणा जबाबदार आहे, हा समज चुकीचा आहे. सुशिक्षितांमध्येही अत्याचाराचे प्रमाण खूप आहे. आपण महिला सुरक्षेच्या नावावर केवळ वल्गणा करतो. महिलांवर अत्याचार घडल्यानंतर आरोपीला पकडणे म्हणजे महिला सुरक्षा नाही. महिलांची सुरक्षा करायची असेल तर अत्याचाराच होणार नाही, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. त्यासाठी पुरुषप्रधान संस्कृती बदलली पाहिजे. विकृत मानसिकता ठेचून काढली पाहिजे. महिलांच्या बाजूने सर्व कायदे असल्याच्या गप्पा करून चिरीमिरीसाठी आरोपीला वाचवणाऱ्या पोलिसांना तत्काळ निलंबित केले पाहिजे. फ्रेन्ड्स हा समोर आलेला एक प्रकार आहे. यापूर्वी असे घडले नसेल व भविष्यात असे घडणार नाही, हे कोणी सांगू शकतो का, असा सवालही सबाणे यांनी केला. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालून प्रथम फ्रेन्ड्सच्या मालकाला अटक करावी व जामीन देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून विभागीय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कायद्याचा धाक असायला हवा

बलात्कारसाठी केवळ दहा वर्षांची शिक्षा पुरेशी नाही. बलात्काऱ्याला फाशीही देण्यात येऊ नये. बलात्कारामुळे तरुणी, महिलेचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे  केलेल्या गुन्हयाचा नराधमांना पश्चाताच व्हावा, यासाठी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यायला हवी. बलात्कार, लैंगिक शोषणाच्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झाली तरच समाजात चांगला संदेश जाईल.

समोर येऊन तक्रार करण्याची गरज

महिलांनी तक्रार करण्यासाठी समोर यायला हवे. प्रथम पोलीस ठाण्यात तक्रार करावी. पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास सामाजिक कार्यकर्त्यांना भेटावे आणि काहीच होत नसल्यास प्रसारमाध्यमांकडे जावे. जेणेकरून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तरी यंत्रणा कामाला लागेल.

पुरुषी मानसिकता बदलायला हवी

पुरुष हा महिलेकडे भोगवस्तू म्हणूनच बघतो. काही पुरुष याला अपवाद आहेत. पण, ही मानसिकता बदलायला हवी. आज समाजाला शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. अन्यथा, कधी मनुस्मृतीचे साम्राज्य प्रस्थापित होईल, हे सांगता येत नाही.