18 February 2020

News Flash

सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला

महापालिकेच्या अखत्यारित सुमारे ९५ तर नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारित ५८ उद्याने आहेत.

वीजदिव्यांवर अधिक भर

नागपूर : महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने शहरात उद्यानांची निर्मिती केली, पण देखभालीवरून ही उद्याने कायम चर्चेचा विषय ठरत आली आहेत. यातील अधिकांश उद्यानात गाजावाजा करत सौर दिवे लावण्यात आले, पण या दिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्यामुळे ते शोभेचेच ठरले आहेत.

महापालिकेच्या अखत्यारित सुमारे ९५ तर नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारित ५८ उद्याने आहेत. शहरातील प्रत्येक झोनमध्ये दहा-बारा लहानमोठी उद्याने आहेत. काही वर्षांपूर्वी हिरवळीच्या यादीत पहिल्या पाचमध्ये असणाऱ्या नागपूर शहरात उद्यानांची नैसर्गिक रचना कायम राखण्यासाठी सौर दिव्यांचा वापर करण्यात आला. सौर पॅनलवर हजारो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, यातील अनेक उद्यानातील सौर पॅनलच्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याऐवजी उद्यानांमध्ये नवीन वीजदिवे लावण्यात येत आहेत. रामदासपेठेतील लेंड्रा पार्कमध्ये सहा-सात सौर दिवे असूनही ते बंद आहेत. याउलट वीजदिव्यांवर अधिक भर देण्यात आला आहे. एकीकडे महापालिका शहराच्या पर्यावरणासाठी ऊर्जा बचतीकडे वाटचाल केल्याचे सांगते. परंतु उद्यानांमध्ये त्याचा पुरता फज्जा उडाला आहे. २०१७ साली महापालिकेने केंद्र सरकारच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या धर्तीवर शहरात अशाच एका प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यासाठी बीआरआर रिन्युएबल एनर्जीची सल्लागार म्हणून नियुक्तीही करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत पथदिवे, प्रशासकीय कार्यालये, शाळा इमारती, सामाजिक भवनासह उद्यानातही विजेची उपकरणे सौर ऊर्जेवर चालवण्यात येणार होती. मात्र, तत्पूर्वीच उद्यानात सुरू असलेल्या सौर दिव्यांची स्थिती वाईट झाली असून या प्रकल्पाअंतर्गत लागणाऱ्या सौर पॅनलवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी वनखात्याच्या अखत्यारितील सेमिनरी हिल्सवरील जपानी उद्यानात सौर ऊर्जेवरील दिवे लावण्यात आले. मात्र, चोरटय़ांनी सौर ऊर्जेवरील दिव्यांची बॅटरीच नाही तर संपूर्ण पॅनलच काढून नेले. त्यानंतर त्याठिकाणी सौरदिवे लागलेले नाहीत.

वीजदिव्यांऐवजी जुनेच सौर दिवे वापरा

सौर पॅनलच्या बॅटरी चोरीला गेल्या असल्या तरी नवीन लिथियम बॅटरी बाजारात आल्या आहेत. या बॅटरी सौर पॅनलसोबतच लावता येत असल्याने चोरीचा प्रश्नच उद्भवत नाही. नवीन वीजदिवे लावण्याऐवजी जुनेच सौर दिवे कसे वापरात येतील, याचा विचार पालिकेने करायला हवा, असे मत रामदासपेठेतील रहिवासी सुधीर पालीवाल यांनी व्यक्त केले. बॅटरी चोरी गेल्यानंतर आम्ही नवीन सौरपॅनलची दुरुस्ती केली आहे, असे महापालिकेचे श्री. मानकर यांनी सांगितले.

First Published on January 23, 2020 12:29 am

Web Title: solar lamps were stolen akp 94
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
2 नागनदी प्रदूषणमुक्त योजनेच्या समितीतून भाजप हद्दपार
3 नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचा ग्रामीण भागांस उपयोग काय?
Just Now!
X