मुख्यालयाकडे ९० लाखांचा प्रस्ताव सादर

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या इमारतींच्या छतावर सौर ऊर्जा निर्मितीचे धोरण जाहीर केल्यानंतर नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवून सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची बचत केली आहे. रेल्वेने पुढल्या टप्प्यात नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानक इमारत आणि रेल्वे रुग्णालयाच्या इमारतीच्या छतांचा सौर ऊर्जा निर्मिती वापर करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासंदर्भातील ९० लाख रुपयांचा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने एप्रिल २०१५ ला नागपुरातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर सौर ऊर्जा केंद्र स्थापन केले.  या केंद्राची १० किलोव्ॉट ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. यासाठी सुमारे १७ लाख रुपयांच्या खर्च आला. प्रत्येक १ किलो व्ॉट ऊर्जा निर्मितीसाठी  १२० चौरस फूट जागेवर ‘सोलर पॅनल’ बसवण्यात आले. या केंद्रातून दररोज सुमारे ४० ते ५० युनिट सौर ऊर्जा निर्मिती होते. महिन्याला साधरणात १५०० युनिट वीज निर्मिती होते. रेल्वे ही वीज महावितरणाला देते. यामुळे रेल्वे दर महिन्याला सुमारे १४ हजार २५० रुपयांची बचत करीत आहे.  रेल्वेचा एक हजार युनिटचा वापर आता ९५० युनिटवर आला आहे. यामुळे गेल्या १३ महिन्यात रेल्वेने १८ हजार युनिटची बचत केली. महावितरणचा वीज वाणिज्यिक वापरचा दर ९.५० रुपये आहे. त्याप्रमाणे रेल्वेने १ लाख ७१ हजार रुपयांची बचत केली आहे. पुढील दहा वर्षांत प्रकल्पावर झालेला खर्च वसूल होईल, असे मध्य रेल्वेचे जनसपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले.

रेल्वे मंत्री प्रभू यांनी भारतीय रेल्वे पुढील वर्षभरात १ हजार मेगा व्ॉट सौर ऊर्जा केंद्र स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी रेल्वेच्या इमारतींचा वापर केला जाणार आहे. या इमारतींवर सौर ऊर्जा निमिर्ती प्रणाली बसण्यात येणार आहे. शिवाय नाविण्यापूर्ण संकल्पनेंतर्गत रेल्वे डब्यांच्या छतावर सोलर पॅनल बसण्याचा विचार सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर नागपूर रेल्वे स्थानक आणि रुग्णालय इमारतीवर मध्य रेल्वेने ५० किलोव्ॉट सौर ऊर्जा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी सुमारे ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानक आणि रेल्वे रुग्णालयाच्या इमारतीच्या छतावर केंद्र उभाण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वे बोर्ड सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागिदारातून उभारण्याचा विचार करत आहे. यामुळे रेल्वेत खासगी गुंतवणूक वाढेल आणि सौर ऊर्जा निर्मितीला गती प्राप्त होईल. त्यामुळे अखेर विजेवरील खर्चात बचत होईल. तसेच स्वच्छ ऊर्जा प्राप्त होईल आणि प्रदूषण कमी होईल. सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे केवळ पैशाची बचत होणार नाही तर कार्बनची वातावरणातील पातळी देखील कमी होणार आहे, असेही पाटील म्हणाले.

वर्षांला १८ हजार युनिटची निर्मिती

नागपुरातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात १० केव्ही क्षमतेचे सौर ऊर्जा केंद्र आहे. त्यातून दररोज सुमारे ५० युनिट वीज निर्मिती होते. वर्षभरात सुमारे १८ हजार युनिट वीज निर्मिती होते. त्यातून रेल्वेची सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची बचत होते. रेल्वे स्थानक, रुग्णालयाच्या छतावर सुमारे ५० केव्ही क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.

– प्रवीण पाटील, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी