मोदी यांचे बंधू सोमभाई यांचा सवाल; विरोधकांना राजकारण न करण्याचे आवाहन
राज्यात मराठवाडय़ासह विविध भागात मोठय़ा प्रमाणात दुष्काळी परिस्थिती असताना राज्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यासाठी काम करीत असल्यामुळे पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त मराठवाडय़ाला भेट देण्याची गरज नसल्याचे मत पंतप्रधानांचे बंधू आणि गुजरातच्या मौद मोदी तेली समाजाचे अध्यक्ष सोमभाई मोदी यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय तलिक साहू महासभेच्या बैठकीच्या निमित्ताने नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून पंतप्रधानांनी मराठवाडय़ाला भेट द्यावी, अशी मागणी केली जात आहे. त्यावर बोलताना सोमभाई मोदी म्हणाले, राज्य सरकार त्यासाठी काम आणि केंद्र सरकार मदत करीत असताना नरेंद्र मोदी यांनी मराठवाडय़ाला भेट द्यावी, असा आग्रह का केला जात आहे? त्यांनी मराठवाडय़ाला जाण्याची काही आवश्यकता नाही.
दिल्लीत बसून केवळ महाराष्ट्राच नाही, तर देशातील प्रत्येक राज्यावर आणि तेथील समस्यांवर त्यांचे लक्ष असून त्या त्या राज्यातील सरकारला ते सूचना करतात. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांनी राजकारण न करता या दुष्काळी परिस्थितीतून राज्याला बाहेर कसे काढता येईल, त्या दृष्टीने काम केले पाहिजे. पंतप्रधानांनी मराठवाडय़ाला भेट देऊन प्रश्न सुटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
गुजरातेत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्याही वेळी आंदोलने केली जात होती. मात्र, आंदोलने जास्त चिघळवली जात आहेत. लोकशाहीत प्रत्येक समाजाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्या त्या राज्यातील सरकार त्यासाठी सक्षम आहे. पंतप्रधान म्हणून त्यांच्या कामावर केवळ मी नाही, तर देश समाधानी आहे.

‘संघ सरकार चालवत नाही’
नरेंद्र मोदी भाऊ असले तरी मी भाजपचा पदाधिकारी किंवा साधा कार्यकर्ताही नाही, त्यामुळे भाजपवर बोलण्याचा माझा अधिकार नाही. अमित शहा यांनी गुजरातेत परत यावे की नाही, याबाबतचा निर्णय भाजप नेते घेतील. लहानपणापासून रा.स्व. संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे नागपूरला प्रथमच भेट दिली. स्मृती मंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेतले.