नागपूरच्या ११ एप्रिलच्या सभेची जय्यत तयारी; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचाही सहभाग
अडचणीच्या काळात नेहमीच काँग्रेसला हात देणाऱ्या विदर्भाकडून आजही या पक्षाला खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे विदर्भातील नागपुरात ११ एप्रिलला होणाऱ्या जाहीरसभेच्या निमित्ताने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी एका व्यासपीठावर येत आहेत. राहुल गांधी उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पहिलीच एकत्रित सभा असल्याने ती यशस्वी करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे.
दिल्लीतील मोदी सरकारने हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आक्रमक प्रचाराचे धोरण स्वीकारल्यावर त्याला तेवढेच चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंतीचे निमित्त साधून नागपूरची निवड केली आहे. नागपूरची संघभूमी म्हणून जशी ओळख आहे, तशीच आंबेडकरवाद्यांसाठी प्रेरणास्थान असलेली दीक्षाभूमीसुद्धा आहे. त्यामुळे येथूनच संपूर्ण देशाला परिवर्तनाचा संदेश देण्याचा काँग्रेसचा हेतू आहे आणि त्यादृष्टीनेच ही सभा महत्त्वाची ठरणार आहे.
या सभेचे हे महत्त्व लक्षात घेऊनच प्रथमच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी एका व्यासपीठावर येणार आहेत.
काँग्रेसला आणीबाणीनंतरही विदर्भातून भक्कम साथ मिळाली होती. विदर्भात आंबडेकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारोपाचा कार्यक्रम घेऊन पक्षापासून दुरावलेल्या दलित समाजाला काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
११ एप्रिलला होत असलेल्या या जाहीरसभेत काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, कार्यकारिणीतील पदाधिकारी सहभागी होत आहेत.
कस्तुरचंद पार्कवरील या कार्यक्रमासाठी तीन मोठी व्यासपीठे तयार करण्यात येणार आहेत. एका व्यासपीठावर नेते व दुसऱ्या व्यासपीठावर भंते आणि तिसऱ्यावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारा चमू राहणार आहे.

एसपीजीकडून दीक्षाभूमीची पाहणी
विशेष सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी दीक्षाभूमी आणि सभास्थळाची पाहणी केली. सोनिया गांधी ११ एप्रिलला सायंकाळी साडे पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील. नंतर त्या दीक्षाभूमीला भेट देतील आणि सायंकाळी सहा वाजता कस्तुरचंद पार्कवर पोहोचतील. दीड तास त्या सभास्थळी राहतील. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही असतील आणि त्यानंतर ते विमानतळाकडे रवाना होतील.