राज्यात मराठी साहित्याचा एक अनोखा संगम झाला असून त्यातून अनेक चांगल्या साहित्यकृती निर्माण झाल्या आहेत. मराठी भाषकांसोबत संवाद साधताना मराठी भाषेला ते हिंदीचा जो तडका देतात तो अधिकच सुखावून जातो, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक लिखित सत्तेच्या सावलीत हा राजकीय कथासंग्रह आणि दृष्टिक्षेप हा वैचारिक लेखसंग्रह या भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांनी आभासी पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते. चाणक्य वार्ता प्रकाशनाने आभासी पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्येष्ठ  समाजसेवक लक्ष्मीनारायण भाला यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती उपस्थित होते.  यावेळी डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, सत्तेच्या सावलीत या कथासंग्रहात पाठक यांनी राजकीय वास्तवाचे यथार्थ चित्रण केले आहे.  याकडे लक्ष वेधत त्यांनी राजकीय विषयावर स्वतंत्र कादंबरी लिहावी.

माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांनी पाठक लवकरच कादंबरी लेखन करतील, असा विश्वास  व्यक्त केला. लक्ष्मीनारायण भाला यांचे अध्यक्षीय भाषण झाले. अविनाश पाठक यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. लता गुठे यांनी आभार मानले.