दीक्षाभूमीवरील पर्यटक, शाळा, वसतिगृहे व सरकारी कार्यालयांना वाहतूक कोंडीचा फटका

दक्षिण अंबाझरी मार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावरुन प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.   कायम वर्दळीच्या या मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे सकाळी ७ ते ८, १० ते १२ आणि सायंकाळी ४ ते ६ या तीन वेळांत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. दीक्षाभूमीवरील पर्यटक, शाळा, वसतिगृहे व सरकारी कार्यालयांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.

शहरातील रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम नागपूर महानगरपालिकेने हाती घेतले आहे. पहिल्या पॅकेजमध्ये १३ कोटी, २८ लाख, २६ हजारांच्या प्रस्तावित दरात रहाटे कॉलनी चौक ते माटे चौकापर्यंतच्या मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात रहाटे कॉलनी ते लक्ष्मीनगर चौकातील रस्त्याच्या एका भागाचे सिमेंटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या भागावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका चिमूकल्या विद्यार्थ्यांना बसत आहे. या मार्गावर अंध विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे आणि दुहेरी वाहतूक एकाच रस्त्याने सुरू करण्यात आल्यामुळे या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे आणि त्याचा फटका या वसतिगृहातील अंध विद्यार्थ्यांना बसत आहे. काही विद्यार्थी बसने तर काही विद्यार्थ्यांना त्यांचे आई-वडील चारचाकी वाहनाने शाळांमध्ये सोडतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखीच भर पडते. याशिवाय दीक्षाभूमीवरही पर्यटकांचे येणेजाणे असतेच. सोबतच शाळा, सरकारी कार्यालये असल्यामुळे पदपथावर चहा, नाश्ता टपऱ्या असल्यामुळे पादचाऱ्यानां पदपथाचासुद्धा आसरा घेता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात तरी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

अपघाताची भीती

आमच्या शाळेत एकूण ३०० सर्वसामान्य विद्यार्थी तर ७० ते ८० अंध व अपंग मुले आहेत. सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे बसेस शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे चित्रकला महाविद्यालयाजवळच या बसेस थांबतात. तेथून या अंध व अपंग मुलांना आणण्यासाठी शाळेच्या दोन लहान बसेसना तीन ते चार फेऱ्या कराव्या लागतात.  त्यातही शाळेच्या गेटमध्ये ही मुले उतरल्यानंतर त्यांना आणण्यासाठी व्हीलचेअर गेटमध्ये घेऊन जावे लागते. शाळेचे शिक्षक आणि कर्मचारीसुद्धा या मुलांना आणतात. तर ज्या अपंग मुलांना बऱ्यापैकी चालता येते, ती मुले अंध मुलांना सोबत घेऊन येतात. रस्त्याच्या कामामुळे शाळेच्या गेटमध्येच बाजूच्या मुंडले हायस्कूलच्या बसेस उभ्या असतात त्यामुळे आणखीच कोंडी होते.  वाहतुकीच्या वर्दळीमुळे अपघाताची भीती वाटते. या मुलांची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची आहे. त्यामुळे मुलांना चित्रकला महाविद्यालयापासून शाळेत घेऊन येण्यापासून तर शाळा सुटल्यानंतर त्यांना बसमध्ये बसवून देण्यापर्यंत आमचा शिक्षकच नव्हे तर कर्मचारी गुंतल्या जातात.

– संगीता उगे, मुख्याध्यापक, कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल.

कोंडीत अडकले..

रहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी चौकाकडे जाणाऱ्या दक्षिण अंबाझरी मार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बी.आर.ए. मुंडले हायस्कूल, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालकाचे कार्यालय, अंध विद्यालय, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, संत चोखामेळा वसतिगृह, कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल आदी शाळा, कार्यालये आहेत. त्यांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.

वाहने लावण्यासाठी जागाच नाही

विद्यार्थ्यांना आम्ही घरून वेळेत नेतो, पण शाळेत पोहोचेपर्यंत उशीर होतोच. कारण वाहने लावण्यासाठी जागाच राहात नाही.  शाळेच्या आवारात त्यांना पोहोचेपर्यंत थांबावे लागते. अशावेळी दुसरी वाहनेसुद्धा येतात,  त्यामुळे आम्हा वाहनचालकांमध्ये खटकेही उडतात. शिवाय दुसऱ्या शाळेसमोर वाहन लावले की त्या शाळेचे व्यवस्थापन आमच्यावर ओरडते. म्हणजे विद्यार्थ्यांनाही सुरक्षित आणि वेळेत पोहोचवायचे आणि शाळा व्यवस्थापनाच्या शिव्याही खायच्या, अशी वेळ आमच्यावर आली आहे.

– रामदास भोयर, वाहनचालक, स्कूल बस

वाहतूक पोलीस नियुक्त करावा

महिनाभरापासून सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या या बांधकामामुळे मुलगा शाळेत जाण्यापासून तर तो परत येईपर्यंत सारखी भीती असते. तो नीट पोहोचला असेल की नाही आणि मग शाळा सुटल्यानंतर तो घरी पोहोचल्याचे ‘कन्फर्मेशन’ घेतो. स्कूल बसचालक व्यवस्थित नेणे-आणणे करत असले तरीही एक असुरक्षिततेची भावना यामुळे निर्माण झाली आहे. एकाचवेळी होणारी वाहनांची गर्दी पाहिली की धस्स् होते.  शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी याठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त केला जावा, असे वाटते.

– सचिन ठाकरे, पालक