X

वायू प्रदूषण आणि पोषणमूल्यरहित आहारामुळे चिमण्यांच्या संख्येत घट

स्पॅनिश संशोधकांचा अभ्यास

स्पॅनिश संशोधकांचा अभ्यास

ग्रामीण भागातील चिमण्यांपेक्षा शहरी भागातील चिमण्यांवर वायू प्रदूषण आणि पोषणमूल्यरहित आहाराचा विशेषत: प्रजनन काळात अधिक परिणाम होतो. यामुळे शहरी भागातील चिमण्यांची संख्या गेल्या काही दशकात लक्षणीयरित्या कमी झाली आहे. याउलट ग्रामीण भागातील चिमण्या शहरी वातावरणाशी चांगल्याप्रकारे जुळवून घेतात. स्पॅनिश संशोधकांनी केलेला हा अभ्यास पर्यावरणशास्त्र व उत्क्रांतीमधील ‘जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

हवेची गुणवत्ता आणि आहार यातील फरकामुळे शहरी भागातील चिमण्यांमध्ये ग्रामीण भागातील चिमण्यांपेक्षा ताणतणावसुद्धा अधिक आहे, असे अ‍ॅम्पॅरो हेर्रेरा-डय़ुनस या संशोधकाने म्हटले आहे. स्पेनमधील माद्रीदच्या कॉम्प्लटेन्स विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र आणि शारीरिक मानवशास्त्र या विभागाच्या सहकार्याने त्यांनी हा अभ्यास केला आहे. शहरातील वातावरण पक्ष्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे शहरात राहणाऱ्या माणसाने त्याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण चिमण्यांप्रमाणेच पर्यावरणाच्या असमतोलाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावरही होत आहे, असे त्या म्हणाल्या.

संशोधनादरम्यान त्यांनी स्पेनमधील इबेरियन पेनिनसुला परिसरातील शहरी, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील शेकडो चिमण्यांच्या रक्ताचे नमुने घेतले, पण हे करताना त्यांनी चिमण्यांना बाधा होणार नाही याचीही काळजी घेतली. प्रत्येक पक्ष्यांकडून त्यांचे वजन आणि शारीरिक क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या रक्ताचे छोटेछोटे नमुने घेतले आणि त्यांना पुन्हा अधिवासात मुक्त केले. या रक्ताच्या नमुन्यांचे विविध भागात विश्लेषण करण्यात आले. यामध्ये पक्ष्यांच्या नैसर्गिक संरक्षणाला कमकुवत करणाऱ्या वातावरणातील प्रदूषणाचाही समावेश होता. यादरम्यान त्यांना ग्रामीण चिमण्यांच्या तुलनेत शहरी चिमण्यांमध्ये उच्च स्तरावर नुकसान पोहचत असल्याचे लक्षात आले. वायु प्रदूषण आणि पोषणमुल्यरहित आहार त्यासाठी कारणीभूत ठरतात. माणसांमध्येही दमा, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे विकार तसेच कर्करोग यासारखे आजार उद्भवू शकतात, असे हेर्रेरा-डय़ुनस म्हणतात.

दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीचा प्रतिकार करण्यासाठी शहरी चिमण्या प्रयत्न करत असल्या तरीही ग्रामीण चिमण्यांच्या तुलनेत त्यांच्यात नैसर्गिकरित्या प्रतिकार करण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे सर्वात आधी शहरातील पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्याकरिता कठोर मेहनत करण्याची गरज आहे. हवेची गुणवत्ता आणि हरित क्षेत्र या दोन घटकांवर अधिक काम करावे लागणार आहे. उद्यानांमधील कचरापेटीत खाल्ल्यानंतर उरलेले पदार्थ आपण तसेच टाकून दिल्या जाते. यात प्रामुख्याने शेंगदाणे, फळे, चिप्स, कुकीज या पदार्थाचा अधिक समावेश असतो. त्याचा आपल्यावरही परिणाम होऊ शकतो, यावर काम करण्याची गरज आहे, असे हेर्रेरा-डय़ुनस म्हणतात. प्रजनन काळ विशेषत: प्रौढ चिमण्यांसाठी अधिक आव्हानात्मक आहे. शहरी जीवनातील तणावांचा पक्ष्यांवर परिणाम होत असल्याने ते कमी वयातच अधिक प्रौढ होताना दिसतात, असेही या संशोधनात आढळले आहे.

Outbrain