प्रशिक्षणाचा खर्च १० हजार ते एक लाख; * प्रत्येक कृतीसाठी वेगळा सांकेतिक शब्द

नागपूर : हौसेखातर श्वान पाळणे ही अनेकांची आवडती गोष्ट. आता या आवडत्या गोष्टीला एक आधुनिक कांगोरा लाभला आहे. घरातील श्वानाने आपल्या आदेशाप्रमाणे वागावे म्हणून श्वानांना खास प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणाचा खर्च चक्क हजारो-लाखोंच्या घरात आहे. यासाठी ‘प्रोफेशनल ट्रेनर’ असून हे प्रशिक्षण दोन महिन्यांचे आहे. या प्रशिक्षणानंतर श्वान अगदी नेमस्त शिपायासारखा वागत असल्याने अनेक जण आपल्या श्वानांना ‘प्रोफेशनल ट्रेनर’च्या हवाले करीत आहेत.

पूर्वी घराची राखण करण्यासाठी श्वान पाळण्यात येत होते, परंतु आता सुरक्षा हे कारण मागे पडले आहे. आता फॅशन म्हणून किंवा आवड आहे म्हणून श्वान पाळले जातात. त्यातही विदेशी प्रजातीच्या श्वानाचे आकर्षण जास्त आहे. मात्र, शहरातील मर्यादित जागेत श्वान पाळताना अनेक अडचणी येतात. सहनिवासात तर कुत्र्यांवरून भांडणेही होतात.

या श्वानांना जशी सवय लावली जाईल तसेच ते वागतात. त्यामुळे नैसर्गिक विधी योग्य ठिकाणी करण्याच्या सवयीपासून ते नमस्कार करणे, हस्तांदोलन करणे, अनोळखी व्यक्तीवर भुंकणे, मालकाने बसायला सांगितले तर बसणे, बोलावले तर जवळ येणे आदी गोष्टी श्वानांनी कराव्या, असे श्वानाच्या मालकाला वाटत असते.

परंतु धावपळीच्या जीवनात ते शक्य होत नाही. यातूनच श्वानांना प्रशिक्षण देणारे ‘प्रोफेशनल ट्रेनर’ पुढे आले असून शहरात गेल्या काही वर्षांत प्रशिक्षण देण्याचे प्रमाण वाढले आहे.

मालक उपस्थित राहणे गरजेचे

केवळ श्वानाला प्रशिक्षण देऊन चालत नाही. श्वानाला शिकवताना त्याचा मालक तेथे उपस्थित राहणे गरजेचे असते. प्रशिक्षण देताना कमांड किंवा पासवर्ड वापरले जातात. ते पासवर्ड उच्चारताच प्रशिक्षित श्वान आज्ञा पाळतो. प्रशिक्षण संपल्यानंतर मालक संबंधित पासवर्डचा वापर करून श्वानाकडून हवी तशी कृती करवून घेत असतो. श्वान पाळणाऱ्यालाही हे प्रशिक्षण दिले जाते. श्वानाला आदेश पालनाच्या सवयी तसेच नैसर्गिक विधीचे संकेत देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. श्वान आक्रमक झाला किंवा अनोळखी व्यक्ती, प्राणी, आवाज यावर सतत भुंकत असेल तर त्याला शांत कसे करावे, याचे प्रशिक्षण असते.

पाळीव कुत्र्यांच्या प्रजाती 

नागपुरात लेब्रॉडोर,  रॉटव्हिलर, गोल्डन रिट्रायव्हर, पीट बुल, अमेरिकन बुली, बिगल, ग्रेट डेन, सेंट बर्नाड, डॅश हाऊंड, चुवावा, मिनी पिंचर, फ्रेच मस्टी बघायला मिळतात. परिस्थितीनुसार लासा, पामेलियन, सिंजू, पग हे श्वान  जुळवून घेतात. यामुळे सहनिवासात राहणाऱ्यांना हे श्वान पाळता येणे सोपे जाते. पीट बूल, फ्रेंच मस्टी अमेरिकन बुली आणि रॉट व्हिलर हे श्वान आक्रमक असतात. त्यामुळे त्यांचा वापर सुरक्षेसाठी केला जातो.

प्रशिक्षणाचे फायदे

दीड महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या श्वानाला योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. प्राथमिक प्रशिक्षणासाठी साधारणत: दोन महिने लागतात. मात्र, पूर्ण प्रशिक्षित श्वान हवा असल्यास त्याच्यावर किमान आठ ते नऊ महिने मेहनत घ्यावी लागते. नागपूरप्रमाणे गोंदिया, गडचिरोली येथे देखील श्वानांना प्रशिक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. मी गेल्या सहा वर्षांत एक हजारांहून अधिक श्वानांना प्रशिक्षण दिले आहे.

दीड महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या श्वानाला योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. प्राथमिक प्रशिक्षणासाठी साधारणत: दोन महिने लागतात. मात्र, पूर्ण प्रशिक्षित श्वान हवा असल्यास त्याच्यावर किमान आठ ते नऊ महिने मेहनत घ्यावी लागते. नागपूरप्रमाणे गोंदिया, गडचिरोली येथे देखील श्वानांना प्रशिक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. मी गेल्या सहा वर्षांत एक हजारांहून अधिक श्वानांना प्रशिक्षण दिले आहे.

 – सारंग हुलके, श्वान प्रशिक्षक

१८ वर्षांपूर्वी आमच्याकडे जर्मन शेपर्ड श्वान होता. त्याला हगवण (गॅस्ट्रो) झाला आणि त्यात तो मरण मरला. आता मी पॉमेलियन श्वान पाळला आहे. तो नऊ महिन्यांचा आहे. त्याला दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. यामुळे श्वान तर प्रशिक्षित झाला, परंतु श्वानाला दूध द्यायचे नसते, हेही कळले. प्रशिक्षणामुळे श्वान माझ्यासोबत चालतो, मी वळलो तर तोही वळतो. मी थांबलो तर तो देखील थांबतो. बस म्हटलं बसतो. शिवाय प्रशिक्षकांडून श्वानाचा सांभाळ करण्याबद्दल अनेक गोष्टी प्रात्यक्षिकासह कळतात. यामुळे श्वानाना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

 – पुष्पक गादेवार,  सनदी लेखापाल (सीए)