कार्यशाळेत शिकवतात जीवन जगण्याचे कौशल्य

नागपूर : सध्याच्या स्पर्धात्मक जीवनात नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या नैराश्याचा परिणाम मुले आणि पालकांच्या नात्यांवरही होत असून त्यांच्यातील संवाद हरवत चालला आहे. हा संवाद पुर्नप्रस्थापित करण्यासाठी आणि  निराश मनांमध्ये सकारात्मक ऊर्जा पेरण्यासाठी स्प्लॅश ही सामाजिक संस्था काम करीत आहे. गेल्या पाच वर्षांपासून संस्थेचे हे विधायक कार्य सुरू आहे.

संस्थेच्या पदधिकारी डॉ. पौर्णिमा करंदीकर न्युरोलॉजिस्ट असून आहेत. या संस्थेच्या प्रवासाबाबत सांगताना त्या म्हणाल्या, वैद्यकीय सेवेत काम करताना समाजाप्रती आपणही काही देणे लागतो या भावनेतून समर्पण अवरनेस फाऊंडेशन या संस्थेची पाच वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून स्प्लॅश आणि संवाद असे दोन उपक्रम राबविले जातात. स्प्लॅश’ हा साधारणत मानसिक आरोग्याशी संबंधीत आणि समाजातील सामान्य नागरिकांसाठी आहे. या दोन्ही उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमांतर्गत डब्ल्यूएचओने सांगितलेल्या जीवन पद्धतीवर दोन दिवसांची महाविद्यालयीन कार्यशाळा आयोजित केली जाते. पहिल्या टप्प्यात दहा जीवन कौशल्य शिकविले जातात. त्याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. डब्ल्यूएचओ त्याला जीवनकौशल्य संबोधते. यामध्ये आत्मभान, भावनाचे समायोजन,ताणतणावापासून मुक्तीचे नियोजन, निर्णय क्षमता, समस्या सोडविणे, चिकित्सक विचार पद्धती, विचारशील विचार पद्धती ,समानभुती, संवाद कौशल्य, नाती सांभाळणे इत्यादी दहा कौशल्य शिकवली जातात. दुसऱ्या टप्प्यात कार्यशाळा आयोजित करुन विषयाची माहिती कशी देणे, वक्तृत्व कसे असले पाहिजे, त्यासाठी अभ्यास कसा केला पाहिजे, याबाबत माहिती दिली जाते. तिसऱ्या टप्प्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षित झालेली मुले महापालिका  शाळेतील मुलांना प्रशिक्षण देत असतात. ही प्रशिक्षण देणारी बहुतेक सर्व मुले व मुली महाविद्यालयीन असतात. आतापर्यंत महापालिका आणि सोमलवार, हडस, टिळक विद्यालय, मानवता विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.  बाबा आमटे यांच्या आनंदवनात तेथील लोकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.

मानसिक संतुलन कसे असावे या विषयावर घेण्यात आलेल्या या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. दहावी व किंवा बारावीच्या निकालाच्या किंवा परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाते. चिटणवीस सेंटरमध्ये दर दोन महिन्यांनी कार्यशाळा घेतली जात असून त्यात सर्व स्तरातील विद्यार्थी आणि पालकांचा समावेश असतो. संस्थेच्या या कार्यात डॉ. सुशील गावंडे, डॉ. आभा बंग सोनी यांच्यासह निर्भय करंदीकर, पल्लवी देशपांडे, विनिता कुळकर्णी, सायली कुळकर्णी-मास्टे, नेहा शर्मा, गायत्री कुंटे, अंजली रामटेके, मुग्धा पाटणकर, शंतनु तुमडे, दिव्या शहा, रोहन पाठक, तृप्ती पारकर, गोरक्षा बिनिवाले आदींचा सहभाग असतो.

रागावर नियंत्रण मिळवण्याचा मंत्र

राग आला की तो कसा आवरायचा, आई वडिलांनी रागावले तर काय करायचे, अभ्यास किंवा परीक्षेच्या काळात  नैराश्य आले तर काय करावे यासंबंधी माहिती दिली जाते. आम्ही या कार्यशाळेत प्रासंगिक उदाहरणे देऊन मुलांचे समुपदेशन करीत असतो. कार्यशाळेव्यतिरिक्त गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करीत असतो. त्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले जाते.

पालकांचेही समुपदेशन

एका मुलाच्या वडिलांना तंबाखू आणि मद्याचे व्यसन होते. घरातील सर्व त्यामुळे त्रस्त होते. तो मुलगा म्हणाला, तुम्ही आम्हाला शिकवता. मात्र माझ्या वडिलांना तंबाखू आणि दारुचे व्यसन आहे ते कसे सोडवता येईल?  त्याच्या या प्रश्नाचे आम्ही प्रयपूर्वक उत्तर शोधून दिले. यासाठी आम्ही अनेकदा पालकांचेसुद्धा समुपदेशन करतो. आमच्या संस्थेत १५ सदस्य आहेत. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चमू आहे. सर्व आपला व्यवसाय सांभाळून संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत असतात.