युवती व महिलांचीही लक्षणीय उपस्थिती

राज्याच्या उपराजधानीत सकल मराठा समाजातर्फे आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चात समाजातील तरुण-तरुणींचा अग्रस्थानी असलेला सहभाग हा सर्वाचे लक्ष वेधून घेणारा ठरला. रेशीमबाग मैदानातून निघालेला मोर्चा कस्तूरचंद पार्कमध्ये विसर्जित झाला.

हातात भगवे ध्वज, गळ्यात दुपट्टा आणि डोक्यावर टोपी परिधान करून शहरासह जिल्ह्य़ातील हजारो अबालवृद्ध मोर्चात सहभागी झाले होते. महाविद्यालयीन युवतींनी या मूक मोर्चाचे नेतृत्व केले. दुपारी १२.३० वाजता मोर्चा निघणार असला तरी सकाळपासूनच रेशीमबाग मैदानावर युवक-युवतीसह महिला-पुरुष जथ्याने येत असताना त्यात अबालवृद्ध मोठय़ा संख्येने दिसून येत होते. मोर्चासाठी  आलेल्यांची कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंद केली जात असताना प्रत्येकाला भगवा दुपट्टा आणि टोपी दिली जात होती. काळा टी शर्ट परिधान असलेले हजारो स्वयंसेवक संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. प्रत्येकाच्या हातामध्ये फलक देण्यात आले होते. मराठा समाजाच्या आरक्षणासह कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली पाहिजे इत्यादी मागण्या असलेले फलक प्रत्येकांच्या हातामध्ये होते. मैदानावर जसजशी गर्दी होऊ लागली तशी केव्हा एकदा मोर्चा निघतो अशी प्रतीक्षा करीत मोर्चेकऱ्री बसले होत. मैदानाचा परिसर भगवामय झाला. गौरी शिंदे आणि आरती भोसले यांनी छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर त्यांनी जिजाऊ वंदना सादर केली. त्यानंतर रंजना वानाफर या युवतीने कोपर्डीच्या घटनेवर प्रकाश टाकला. रेशीमबाग मैदानातून १२.२० मोर्चाला प्रारंभ झाला. रागिनी मोहिते, राजलक्ष्मी शिंदे, नेहा गायकवाड, पूनम शिंगणे, प्रांजली वानखेडे, राणी साठे, वैष्णवी लांडे, अक्षता खंडागळे, प्रांतीदा जाधव यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. त्यांच्या मागोमाग महिला आणि युवती सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर पुरुष आणि युवक मोर्चात सहभागी झाले होते.

तुळशीबाग रोड, महाल, गांधीगेट, शुक्रवार तलाव, आग्याराम देवी चौक, कॉटेन मार्केट, लोखंडी पूल, टेकडी रोड, संविधान चौक माग्रे हा मोर्चा ३.३० च्या सुमारास कस्तुरचंद पार्कवर पोहोचला. यावेळी कोपर्डी अत्याचारात बळी गेलेल्या मुलीला श्रध्दांजली अर्पण करून जिजाऊ वंदना सादर करण्यात आली.

भोसले घराण्यासह राजकीय नेत्यांचा सहभाग

सकल मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये सामान्य लोकांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात असला तरी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. भोसले घराण्यातील श्रीमंत मुधोजी राजे भोसले, रघुजीराजे भोसले, संग्रामसिंग भोसले, जयराजसिंग भोसले, मोहिनीराजे भोसले, वासंतीराजे भोसले, यशोधरा राजे भोसले यांच्यासह विदर्भवीर जांबुवंतराव धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील शिंदे, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक राजू नागुलवार, माजी खासदार प्रकाश जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, भाजयुमोचे माजी अध्यक्ष बंटी कुकडे, श्रीकांत आगलावे, अमोल ठाकरे, काँग्रेसचे युवा शहर अध्यक्ष बंटी शेळके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, रत्नकला बलराज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुस्लिमांनी पाण्याची सोय केली

रेशीमबागमधून मोर्चाला प्रारंभ झाल्यानंतर प्रत्येक चौकात व्यवस्थेसाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले असले तरी महाल भागात मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी आणि व्यापऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. मात्र, काही अंतर चालले असताना त्यांना त्रास होऊ लागल्याने गाडीमध्ये बसविण्यात आले. महाल भागात एका ज्येष्ठ नागरिकाला भोवळ आली. मात्र, त्यांना रुग्णवाहिकेमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार केले. कॉटेन मार्केट परिसरात पिण्याची पाण्याची सोय केली होती.

आरक्षणाची मागणी

मोर्चात सहभागी झालेल्या राजलक्ष्मी शिंदे, नेहा गायकवाड, प्रांजली वानखेडे या युवतींशी संवाद साधण्यात आला असताना त्यांनी सांगितले, मराठा समाजाला गेल्या अनेक वषार्ंपासून आरक्षण मिळावे यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. आरक्षण आणि अ‍ॅट्रासिटीच्या मुद्यावर प्रसार माध्यमासह राजकीय नेते लक्ष केंद्रित करीत असले तरी कोपर्डीची घटना आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोपर्डी घटनेचा खटला शीघ्र गती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना कडक शिक्षा करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

रुग्णवाहिकेला जागा दिली

महाल भागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून मोर्चा जात असताना त्या मार्गाने सायरन वाजवत एक रुग्णवाहिका आली असताना मोर्चा थांबविण्यात आला आणि रुग्णवाहिका गेल्यावर मोर्चा समोर निघाला. शिवाय एका वयोवृद्ध महिलेला थकल्यासारखे वाटल्याने स्वयंसेवकांनी त्यांना गाडीत बसविले.

अबाल वृद्धांचाही सहभाग

हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये आबालवृद्ध सहभागी झाले असताना मैदानात किंवा मोर्चा मार्गावर कुठेही कचरा होऊ नये याची काळजी घेत  स्वयंसेवकांनी कचरा उचलण्याचे काम केले. पाण्याचे प्लास्टिक पाऊच किंवा खाद्य पदाथार्ंचे पाकीट फेकले जात असताना ते स्वयंसेवक लगेच उचलून जमा करीत होते. मोर्चाच्या मागे कनकच्या गाडय़ा होत्या आणि त्याच हा कचरा टाकला जात होता. त्यामुळे कुठेही कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले नाही.