देखरेख ठेवण्यासाठी ५५ भरारी पथके

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत असून मंडळातर्फे यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यावर मंडळाने विशेष भर दिला आहे. यावेळी एकूण परीक्षा केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी ५५ भरारी पथके राहणार आहेत. नागपूर विभागीय मंडळात ६८२ परीक्षा केंद्रांवर १ लाख ८७ हजार ८३७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गेल्या काही वर्षांत दहावी आणि परीक्षेच्या संवेदनशील केंद्राची संख्या ४० ते ५० असताना यावेळी मात्र केवळ दोनच संवेदनशील केंद्र असल्याची नोंद आहे.

[jwplayer SymEqUFS]

१ लाख ८७ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी ९९ लाख २८८ हजार विद्यार्थी व ८८ हजार ५४९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. भंडाऱ्यातून २१ हजार १८२ (केंद्र ८८) , चंद्रपूरमधून ३४ हजार ९५० (केंद्र १२६) , नागपूरमधून ७१ हजार ०९९ (२२२), वध्र्यामधून २० हजार ७०४ (७८), गडचिरोलीमधून १६,८६६ (७२), तर गोंदियामधून २३ हजार ०३६ (९८) विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाने काही योजना आखल्या आहेत. अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतीसाठी अर्ज देणे आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर विभागीय मंडळात परीक्षा मंडळातर्फे विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकंदर ५५ भरारी पथके राहणार असून त्या मंडळांची चार पथके आकस्मिक पथक म्हणून परीक्षेच्या दिवसात काम पाहणार आहेत. आतापर्यत या परीक्षेत ११ वाजता विद्यार्थ्यांंना प्रश्न आणि उत्तरपत्रिका दिली जात होती. मात्र, यावेळी परीक्षा सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी ती दिली जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अध्ययन अक्षम (डिस्लेक्सिया, डिसकॅलक्युलिया, डिसग्राफिया ) विद्यार्थ्यांना गणित विषयांसाठी कॅलक्युलेटर वापरता येतील.

विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘हेल्पलाईन’

जे विद्यार्थी किंवा शिक्षक मोबाईलचा वापर करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण यांनी सांगितले. परीक्षेच्या काळात होणारे गैरप्रकार बघता शहर आणि ग्रामीण भागातील काही केंद्रांवर व्हीडिओ चित्रण करण्यात येणार आहे. कॉपी पुरविणे किंवा विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर व संबंधित केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. प्रवेशपत्र, वेळापत्रक, बैठक व्यवस्था आदींबाबतच्या शंकांनिरसनासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘हेल्पलाईन’ कार्यान्वित केली आहे. नागपूर आणि अमरावती विभागीय मंडळाचे ‘हेल्पलाईन’चे क्रमांक पुढीलप्रमाणे- नागपूर ०७१२- २५५३५०३, अमरावती- ०७२१- २६६२६०८.

[jwplayer rYyKZ0hv]