नागपूर जिल्ह्य़ातील धक्कादायक स्थिती; सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह

एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचा दावा महामंडळ करीत असले तरी नागपूर जिल्ह्य़ात एसटी बसच्या जीवघेण्या अपघाताची संख्या दीड पटींनी वाढली आहे.

चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून एसटीकडे बघितले जाते. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक नागरिक शिक्षण, व्यवसाय, नोकरीसह विविध कामांकरिता एसटीनेच प्रवासाला प्राधान्य देतात. नफा-तोटय़ाचा विचार न करता केवळ प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून एस.टी. शहरापासून मागास व दुर्गम गावात नियमित सेवा देते. बसमध्ये प्रशिक्षित चालक तसेच प्रत्येक बसची नियमित देखभाल दुरुस्ती केली जात असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळेच एसटीचा प्रवास सर्वात सुरक्षित असल्याचे अधिकारी सांगतात, परंतु एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०१७ या सात महिन्यांच्या काळात प्राणांतिक अपघातांची (प्रवाशांचा मृत्यू) संख्या वाढली आहे. या काळात जिल्ह्य़ात तब्बल ११ जीवघेणे अपघात झाले. गेल्यावर्षी याच काळात ही संख्या सात होती.

एसटीच्या किरकोळ स्वरूपाच्या अपघातातही वाढ झाली असून गेल्यावर्षीच्या ५ अपघातांच्या तुलनेत यंदा ९ अपघात झाले आहेत. या कालावधीत गंभीर स्वरूपाच्या अपघातात मात्र घट झाली आहे. गेल्यावर्षीच्या ३५ अपघाताच्या तुलनेत ही संख्या यंदा २३ वर आली आहे. एसटीच्या वाढलेल्या अपघाताला चालकाने मोबाईलवर  बोलणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, रस्त्यांवरील खड्डे यासह इतरही अनेक कारणे जबाबदार आहेत.

रस्त्यावरील खड्डे व धोकादायक वळणे 

शहर आणि जिल्ह्य़ात रस्ते विकासाची कामे सुरू असल्याने अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे अपघाताची शक्यता असते. अनेक ठिकाणी असलेली धोकादायक वेळणेही अपघातासाठी कारणीभूत ठरतात.

एसटी अपघाताची स्थिती

(१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०१७)

वर्ष     गंभीर   किरकोळ   जीवघेणे

२०१६   ३५           ७            ५

२०१७   २३         ११            ९