नागपूर : ‘एसटी’चे कार्यालयीन कामकाज मराठी भाषेत करण्याची सक्ती असतानाही काही जण टाळाटाळ करतात. त्यामुळे महामंडळाने प्रत्येक विभाग नियंत्रक कार्यालयाला मराठीत काम करणे टाळणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

कार्यालयीन नोंद, पत्रव्यवहार करताना इंग्लिश शब्द लिहिल्यास प्रत्येक शब्दामागे १०० रुपये दंड आकारण्याचेही या आदेशात नमूद केले आहे. या कारवाईची नोंद संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत आणि गोपनिय अहवालात करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाने १ मे १९६६ पासून वर्जित प्रयोजने वगळता सर्व काम मराठीतून करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार एसटी महामंडळानेही  सूचना केली आहे. परंतु त्यानंतरही  १०० टक्के काम मराठीत होत नाही. त्यामुळे नुकतेच सर्व विभाग नियंत्रकांना नव्याने आदेश देत मराठीत काम न करणाऱ्यांवर कारवाई करायला सांगण्यात आले आहे.

सयुक्तिक कारणे नसतानाही मराठीत कामास टाळाटाळ करणाऱ्यांना लेखी ताकीद, गोपनीय अहवालात नोंद, एका वर्षाकरिता बढती रोखणे किंवा पुढे एका वर्षाकरिता वेतन वाढ रोखणे ही शिक्षा देण्याची सूचना आहे.