News Flash

एकाच्या वेतन खात्यात ६० तर दुसऱ्याच्या ९८ रुपये!

‘एसटी’च्या मोर्शी आगारातील प्रकार; प्रशासन म्हणते, वेतन नव्हे फरकाची रक्कम

‘एसटी’च्या मोर्शी आगारातील प्रकार; प्रशासन म्हणते, वेतन नव्हे फरकाची रक्कम

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मे महिन्याच्या वेतनापोटी पहिल्या टप्यात ५० टक्के वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावती विभागातील मोर्शी आगारातील कर्मचाऱ्यांनाही वेतन दिले गेले. परंतु एका कर्मचाऱ्याच्या वेतन खात्यात केवळ ६० रुपये तर दुसऱ्याच्या खात्यात ९८ रुपयेच जमा झाल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी मात्र ही रक्कम वेतनाची नसुन कामगार करारातील वेतनाच्या फरकाची असल्याचा दावा केला आहे.

टाळेबंदीनंतर एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खालावली आहे. शासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या अनुदानातून कर्मचाऱ्यांना कसेतरी वेतन दिले जात आहे. मे महिन्यातही पहिल्या टप्यात एसटी कर्मचाऱ्यांना निम्मे वेतन देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. परंतु वेतनातून एस. टी. बँकेची रुपी फंडाची व पतसंस्थेची (सोसायटी) वसूली नियमानुसार करावीसह इतरही ६ कपातीचे निकष ठरवून दिले गेले आहे. याप्रसंगी वेतन किमान १/४ कर्मचाऱ्यांच्या हाती पडेल अशी व्यवस्था करण्याचे आदेशात नमुद आहे. परंतु वेतन झाल्यावर अनेकांच्या खात्यात कमी रक्कम जमा झाल्याची मोर्शी आगारातील बऱ्याच कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

येथील अंबिका गांजरे या कर्मचाऱ्याच्या खात्यात केवळ ६० रुपये तर के. एम. राठोडच्या खात्यात ९८ रुपयेच जमा झाले.  पी. बी. घटोल या कर्मचाऱ्याला ७८४ रुपये, शारदा कुराडे यांना १७३ रुपये, मंगला उईके यांना ३९२ रुपयेच खात्यात आल्याचे आढळले.   गांजरे आणि राठोड या दोन्ही महिला प्रसूती रजेवर आहेत.  घटोल या कर्मचाऱ्याचे दोन्ही मूत्रपिंड निकामी असल्याने तोही वैद्यकीय रजेवर आहे.  इतरही वैद्यकीयसह इतर कारणांनी टाळेबंदीपूर्वीपासून रजेवर आहेत. या कर्मचाऱ्यांच्या खात्यात अत्यल्प रक्कम आल्याने सगळ्यांनाच मानसिक धक्का बसला असून त्यांनी स्थानिक कार्यालयासह मुंबईतील मुख्यालयातही या प्रकरणाची तक्रार केली आहे.  कामगार संघटनाही या प्रकरणावर संतापली आहे. परंतु प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना वेतन नव्हे तर कामगार करारातील वेतनाच्या रकमेतील फरकेची रक्कम दिल्याचे सांगण्यात येत आहे. हे कर्मचारी सेवेवर हजर झाल्यावरच त्यांचे वेतन होणार असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. परंतु प्रसूती रजेवरील व्यक्तींसह मूत्रपिंड निकामी झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवता येते काय,  हाही प्रश्न कामगार संघटना उपस्थित करत आहे.

या कर्मचाऱ्यांपैकी काही जण प्रसूती तर काही वैद्यकीय रजेवर आहेत. सध्या त्यांना तांत्रिक कारणाने वेतन देता येत नाही. परंतु त्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास अथवा ते हजर होताच त्यांना वेतन दिले जाईल. त्यांच्या खात्यात टाकलेली रक्कम वेतन करारातील फरकाची आहे. सर्व प्रक्रिया नियमानुसारच झाली आहे.

– श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, अमरावती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 4:37 am

Web Title: st bus staff at morshi depot get 60 rs salary where as other employees get rs 98 zws 70
Next Stories
1 टाळेबंदीत वाहन विमा कंपन्यांना शंभर कोटींचा फटका
2 शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांकडून पाच लाखांच्या खंडणीची मागणी
3 सुशांतच्या प्रेमापोटी १४ वर्षाच्या मुलानं केली आत्महत्या?
Just Now!
X