News Flash

‘एसटी’च्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर प्रवाशांच्या मदतीची जबाबदारी!

नागपूरसह राज्यातील अनेक विभाग नियंत्रक कार्यालय हद्दीत सध्या ४० टक्क्यांपर्यंत फेऱ्या पूर्ववत झाल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

४० टक्केच फेऱ्या सुरू असताना आदेशाने आश्चर्य

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : करोना काळात एसटीला प्रवासी मिळत नसल्याने महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. ‘एसटी’ची आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी महामंडळाने एसटीच्या विभागीय कार्यालय, आगारातील लिपिकासह इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवासी गर्दीच्या थांब्यावर प्रवासी चढ-उतार करण्यासाठी लावण्याचे आदेश काढले आहेत. त्यातच सध्या नागपूरसह इतरही बऱ्याच विभागांत एसटीच्या केवळ ४० टक्के फेऱ्या सुरू आहेत.

राज्यातील बऱ्याच भागात करोनाचा प्रभाव ओसरल्याने आता एसटी महामंडळाने एसटीची प्रवासी वाहतूकही सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नागपूरसह राज्यातील अनेक विभाग नियंत्रक कार्यालय हद्दीत सध्या ४० टक्क्यांपर्यंत फेऱ्या पूर्ववत झाल्या आहेत. प्रवासी नसतानाच एसटीने राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालयाला आदेश पाठवत तेथील लेखा शाखेसह पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवासी गर्दीच्या थांब्यांवर प्रवाशांना मदत करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, आदेशात विभागातील अंतर्गत वाहतूक प्रवासी प्रतिसाद बघत १०० टक्के सुरू करणे, पुणे विभागातील दौंड आगारातील ज्या लांबपल्ला फेऱ्यांना चांगले भारमान होते, त्या फेऱ्या पुन्हा सुरू करणे, ज्या चालक/ वाहकांचा दैनंदिन चालनासाठी वापर होणार नसेल अशा कर्मचाऱ्यांनाही महत्त्वाच्या गर्दीच्या थांब्यावर तसेच ठरावीक मार्गावर प्रवासी चढ-उतार करण्यासाठी कामगिरी द्यावी, बसेस व बसस्थानकांची वेळोवेळी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, विनावाहक बुकिंगच्या वाहक नियोजित ठिकाणी वेळेत हजर होत नसल्यास मार्ग तपासणी पथकाकडून अचानक तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याच्याही आदेशात सूचना आहेत.

टाळेबंदी उठू लागल्याने एसटीचे प्रवासी वाढ सुरू झाली असून सध्या नागपूर विभागात ४० टक्के एसटीच्या फेऱ्या पूर्वपदावर आल्या आहेत. नागपुरात सध्या २० ते २२ थांबे आहेत. तर ग्रामीण भागात तालुका स्तरावर एक-दोन थांबे असतात. त्यामुळे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या सेवा सोमवारपासून रोटेशन पद्धतीने विविध गर्दीच्या थांब्यावर प्रत्येकी ३ तासांसाठी लावण्यात आल्या असून नियोजनानुसार एकाला आठवडय़ात दोन वेळाच सेवा द्यावी लागेल. त्यामुळे एसटीचे प्रवासी आणखी वाढण्याची आशा आहे.

– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 1:19 am

Web Title: st s office staff responsible for helping passengers zws 70
Next Stories
1 पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती!
2 वेब सिरीज बघून शांत डोक्याने ‘तो’ खून
3 ‘राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार’
Just Now!
X