मी ३० वर्षांपासून आंदोलन करत आलोय. दूध किती ओतले जाते.. त्यात दूध किती आणि पाणी किती असते, याची मला माहिती आहे. मीच या शेतकऱ्यांचा नेता आहे, असे भासवून निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन एका गर्विष्ठ व्यक्तीने केलेले आंदोलन असल्याचा टोला, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना लगावला. रविवारी रात्री १२ पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरासाठी आंदोलन सुरू केले आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर फोडून रस्त्यावर दूध ओतले जात आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सरकारने दूध दराचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षांच्या गटनेत्यांबरोबर बैठक घेतली होती. आम्ही ३ रूपये दुधाची दरवाढ दिली आहे. आता खासगी आणि सहकारी संस्थांनीही ३ रूपयांची दरवाढ जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकार चर्चेला तयार आहे. त्यांनी मागण्या घेऊन यावे. सरकारचे दरवाजे चर्चेसाठी सदैव उघडे आहेत. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. ज्याला प्रश्न सोडवयाचे आहेत, त्याला निमंत्रण देण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला निमंत्रण दिलेले नाही, असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले होते. त्यावर खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधला.

सदाभाऊ खोत हे पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. राजू शेट्टी यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. पण राज्य सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावरून दोन्ही नेत्यांमध्ये फूट पडली. सदाभाऊंनी राजीनामा देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. दरम्यानच्या काळात सदाभाऊ यांनी स्वतंत्र शेतकरी संघटना स्थापन केली आहे.