आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनावर उधळण्यासाठी राज्याच्या वनखात्याकडे कोटय़वधी रुपये आहेत, पण पर्यावरणात वाघापेक्षाही महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गिधाडांचा मात्र राज्याच्या वनखात्याला विसर पडला. निसर्गाचा ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी वनखात्याकडून दुर्लक्षित राहिला. वाघ आणि गिधाड दोन्हीही अनुसुची एकमध्ये येणारे, पण वाघाबाबत आवडतीचा आणि गिधाडांबाबत नावडतीचा न्याय, अशा वनखात्याच्या या भूमिकेवर पक्षीप्रेमींच्या वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी पर्यावरणातील गिधाडांची भूमिका जाणली होती आणि म्हणूनच सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी देशपातळीवर गिधाड जनजागृती दिन साजरा करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यांच्या या निर्देशाचे पालन केंद्रीय वन आणि पर्यावरणाची धुरा त्यांच्या हातात असेपर्यंत झाली. केवळ खात्याची धूरा हाती होती म्हणूनच नव्हे, तर जंगल आणि पर्यावरणाविषयीची त्यांची आस्था सर्वश्रूत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतचा अदानी प्रकल्प ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला तेही सर्वश्रूत आहे. परिणामी, त्यांना खाते गमवावे लागले, पण त्यांनी दिलेल्या संदेशाचा विसरही वनखात्याला पडला. राज्याच्या वनखात्याचे मुख्यालय नागपुरात आहे. दोन वर्षांआधीपर्यंत गिधाडांवर चर्चासत्र, मार्गदर्शन,

सादरीकरण, असे कार्यक्रम घेऊन थोडय़ाफार प्रमाणात तो साजरा करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसचे सरकार गेले आणि दोन वर्षांत ती धारसुद्धा कमी झाली. यावर्षी वनखात्याचे कहरच गाठला. वन मुख्यालयात साधे सादरीकरणसुद्धा झाले नाही आणि आपापल्या पातळीवर तो साजरा करण्याचे निर्देश वन मुख्यालयातून देण्याचे आल्याचे कळले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जंगल आणि वन्यजीवांवरचे प्रेम सर्वश्रूत आहे. राज्याच्या वनखात्याची धुरा हाती आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने वनखाते ‘हायटेक’ करण्यासाठी प्रयत्न चालवले, तेही साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र, त्याचवेळी वाघ आणि गिधाडांच्या बाबतीत त्यांनी ही भूमिका घ्यावी, हे अनेकांना खटकले. एक महिन्यापूर्वी व्याघ्रदिन मोठा थाटामाटात साजरा करण्यात आला. गिधाड दिनाला मात्र उदासिनता दाखवण्यात आली. वनमंत्र्यांची आणि एकूणच वनखात्याची गिधाडांबाबतची दुर्लक्षित भूमिका गिधाडांच्या भवितव्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

यंदा वनखात्याने असे का केले? -गोपाळ ठोसर

यासंदर्भात माजी मानद वन्यजीव रक्षक व ज्येष्ठ पक्षी अभ्यासक गोपाळ ठोसर यांना विचारले असता त्यांनीही यावर आश्चर्य व्यक्त केले. निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या आययुसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर) च्या लाल यादीत ‘अति धोकादायक’ वर्गात गिधाडांची नोंद आहे. त्यांच्या संवर्धनासाठी विशेष निधीही वितरित होतो. गिधाड जनजागृती दिन हा संवर्धनाचाच एक भाग आहे आणि तो साजरा करणे अपेक्षित आहे, त्यामुळे यावर्षीची वनखात्याची दुर्लक्षितपणाची भूमिका मलाही कळली नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.