राज्यातील सरकार कोण चालवत हेच कळत नाही. राज्य सरकारचा रिमोट हा सिल्व्हर ओकवर आहे; परंतु बॅटरी मात्र दिल्लीत आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला लगावला. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकीनिमित्त शनिवारी येथे मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री वेगळे बोलतात, सिल्व्हर ओक वेगळे आणि दिल्लीवरून वेगळा निर्णय घेतला जातो. मुळात या सरकारला काम करायचे नाही. रंग बदलला नसल्याचे भाषणातून सांगितले जात असले तरी मात्र प्रत्यक्षात वेगवेगळे रंग सोबत घेऊन सरकार चालविले जात आहे. हे सरकार किती दिवस चालेल याचा विचार सोडून द्या. आपल्याला विरोधी पक्षाच्या भूमिकेत पूर्ण ताकदीने जावे लागणार आहे. विरोधी पक्ष म्हणून रोज सरकारवर हल्ला चढवू. जिल्ह्य़ात भाजपची ताकद कमी झाली असे वाटत असेल; पण भाजपची पाळेमुळे जमिनीपर्यंत रोवली आहेत. एखादा पराभव झाल्याने खचून जाण्याचे कारण नाही. देशात फुटीरतावादी लोक अराजक तयार करीत आहेत. काही राजकीय पक्षदेखील सत्तेपासून दूर असल्याने अराजकता पसरवत आहेत असा आरोप केला.

हिंमत असेल तर राज्यात ‘सीएए’ लागू करा

ज्यांनी निवडणुकीच्या वेळी महायुती म्हणून निवडणूक लढविली आहे त्यांनी विचारधारा सोडून दिली. सत्ता बदलल्यावर त्यांचे विचार बदलले. आम्हाला शहाणपण शिकवू नका. अशी नुसती भाषणे करायची; पण  शहाणपणा दाखवायचा नाही. सावरकरांचा अपमान होत आहे. अशा वेळी आपला बाणा दाखवा ना. हिंमत असेल नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.