News Flash

राज्यात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता स्थितीत राज्यातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आहे.

संग्रहित छायाचित्र

नागपूर जिल्ह्यतही प्रदूषित नद्या, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता स्थितीत राज्यातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. नागपूर जिल्ह्यतही प्रदूषित नद्या आढळल्या. मात्र, त्याचवेळी २०१७च्या तुलनेत नद्यांचे प्रदूषण कमी झाले असल्याचे मंडळाने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील १७६ नद्या आणि इतर ठिकाणी समुद्र, धरणे, कूपनलिका, विहिरी आदी मिळून २२८ पाणी गुणवत्ता तपासणी केंद्राच्या आणि ६६ भूजल सर्वेक्षण केंद्राच्या माध्यमातून अभ्यास करून हा अहवाल जाहीर केला आहे.  प्रदूषणाच्या आधारावर मंडळाने महाराष्ट्रातील पाणी गुणवत्ता निर्देशांक ठरवला आहे. ६३-१०० – उत्कृष्ट श्रेणी, ५०-६३ – मध्यम श्रेणी, ३८-५० –  वाईट श्रेणी, ३८ पेक्षा कमी – अतिशय वाईट श्रेणी अशी श्रेणी आहेत. या सर्वेक्षणात पाण्याचे ४३ मापदंड तपासण्यात आले. मात्र, निर्देशांक ठरवताना पीएच, डीओ, बीओडी आणि टी इकोली फार्म हेच मापदंड ठरवण्यात आले. या मापदंडानुसार, राज्यातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आढळली. तसेच कमी प्रमाणात वर्धा, वैनगंगा, प्राणहिता प्रदूषित आढळल्या. राज्यात नागपूर जिल्ह्यतील बहुतेक नद्या आणि जलस्रोत प्रदूषित आढळले. तसेच अहमदनगर, जळगाव, पुणे, अकोला, ठाणे, पालघर जिल्ह्यतील काही जलस्रोत प्रदूषित आढळले. भूजलाबाबत ११ मापदंड ठरवण्यात आले. त्यात पीएच, टीएच, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, क्लोराईड, टीडीएस, फ्लोराईड, नायट्रेट आणि सल्फेटचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यतील काही स्रोत अत्यंत प्रदूषित, पिण्यास अयोग्य श्रेणीत तर अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, रायगड येथील भूजल स्रोत प्रदूषित आढळले. ६६ नमुन्यांमध्ये ३६ नमुने प्रदूषित आढळले. त्यात नागपूर जिल्ह्यत १२ तर कोल्हापूर जिल्ह्यतील सात नमुन्यांचा समावेश आहे.

नागपुरात १४ पैकी १२ केंद्रातील नमुने प्रदूषित

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-१९ या वर्षांत केलेल्या निरीक्षणात भूजल आणि नद्या प्रदूषणात नागपूर सर्वाधिक प्रदूषित आहे. नागपूर जिल्ह्यत १४ नमुन्यातील १२ केंद्रातील नमुने प्रदूषित, कोल्हापूर जिल्ह्यत १५ पैकी १० नमुने प्रदूषित, पुणे जिल्ह्य़ात सहापैकी तीन नमुने प्रदूषित, ठाणे जिल्ह्यत पाचपैकी तीन नमुने प्रदूषित, रायगड जिल्ह्यत तीनपैकी एका ठिकाणी प्रदूषित, चंद्रपूर जिल्ह्यत दोनपैकी एका ठिकाणी प्रदूषित तर अमरावती जिल्ह्यत तीनपैकी एक केंद्र प्रदूषित आढळले.

स्थिती चिंताजनक

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१९च्या अहवालात देशात महाराष्ट्रात सर्वाधिक नद्या प्रदूषित आहेत. २०१८ मध्ये ५३ तर २०१९ मध्ये ४५ नद्या प्रदूषित झाल्या आहेत. २०१७-१८च्या तुलनेत प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले असले तरीही ते चिंताजनक आहे, असे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 1:22 am

Web Title: state river tapi most polluted akp 94
Next Stories
1 एसटीतील विनातिकीट प्रवाशांच्या दंडावर आता ‘जीएसटी’!
2 सव्वादोन वर्षांसाठी दोन महापौर!
3 पुढील सव्वादोन वर्षांत दोन महापौर
Just Now!
X