कौटुंबिक न्यायालयाने निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या त्यांनी मुलीला जन्म दिला, परंतु आता त्यांच्यात वाद निर्माण झाला असून तो संबंधित महिलेला पत्नी म्हणून नाकारत आहे, तर तिने संबंधित पुरुषच आपला पती असल्याचा दावा केला असून दोघांमधील नात्याला नेमके काय नाव द्यावे, हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे दोघांनीही न्यायालय गाठले. ते ‘पती-पत्नी’ आहेत किंवा नाही, हे ठरविण्याची जबाबदारी आता कौटुंबिक न्यायालयावर आली आहे.

एकावन्न वर्षीय रमेश (नाव बदललेले) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुख्यालयाशेजारीच्या एका प्रसिद्ध शासकीय शिक्षण संस्थेत प्राध्यापक आहे, तर चौपन्न वर्षीय वर्षां (नाव बदललेले) एका शिक्षण संस्थेत शिक्षिका आहे. दोघेही जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत राहतात. अनेक वर्षांपासून ते ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहात होते. यातून त्यांना प्राजक्ता (नाव बदललेले) ही मुलगी झाली. मात्र, यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि रमेश २ वर्षांपासून वेगळा राहू लागला. मात्र, वर्षांने रमेशसोबतच राहण्याचा निर्णय घेऊन एक दिवस ती त्याच्या घरातच शिरली. त्यावेळी रमेशने तिला हाकलून लावले आणि कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला. यावेळी त्याने न्यायालयाला सांगितले की, वर्षां ही आपली पत्नी नाही. त्यामुळे तिने आपल्या घरात घुसू नये, अशी विनंती केली, तर वर्षांनेही त्या खटल्यात उत्तर दाखल करून रमेशच आपला पती असल्याचा दावा केला. मात्र, दोघांच्याही लग्नासंदर्भात कौटुंबिक न्यायालयासमोर पेच निर्माण झाला आणि हे प्रकरण आपल्या कार्यकक्षेत येत नसल्याचे कारण देऊन न्यायालयाने खटला फेटाळला. त्यानंतर रमेशने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी न्या. वासंती नाईक आणि न्या. विनय देशपांडे यांच्यासमक्ष झाली.

न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून कौटुंबिक न्यायालयाने दोघांचा विवाह झाला किंवा नाही, हे ठरवावे. त्यानंतर इतर मुद्दे विचारात घ्यावे, असे आदेश दिले.

असा आहे पेच..

वर्षां पूर्वीपासूनच विवाहित आहे. मात्र, ती पतीसोबत राहात नाही. त्यामुळे आपणही एकटे असल्याने तिच्यासोबत ‘लिव्ह-इन’मध्ये होतो. यातून मुलगी झाली, परंतु तिचा पहिला विवाह अस्तित्वात असताना आपण तिचा पती कसा होऊ शकतो?, असा सवाल करून रमेशने वर्षां आपली पत्नी नसल्याचा दावा केला, तर वर्षांने याला उत्तर देताना न्यायालयाला सांगितले की, १९९४ पासून आपला पहिला नवरा आपल्यासोबत नाही. तो जिवंत आहे की, मरण पावला, हेही माहीत नाही. त्यामुळे पहिला विवाह आपोआपच संपुष्टात आला आहे. त्यानंतर आपण रमेशसोबत ‘लिव्ह-इन’मध्ये राहात होते. यातून दोघांना मुलगी झाली. दोघांचाही विवाह झाला असून रमेशच आपला कायदेशीर पती असल्याचा दावा वर्षांने केला आहे.