नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ जयंतीनिमित्त एरव्ही  दीक्षाभूमी परिसरात भीमसौनिकांची गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. मात्र मंगळवारी  करोनाच्या पार्श्वभूमीवर शांतता होती. नागरिकांनी घरी थांबूनच तर शासकीय, निमशासकीय कार्यालयात निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकर जयंती पार पडली.

संविधान चौकातील व दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व भीमसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रिपब्लिकन नेते व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी निवासस्थानी कुटुंबासमवेत आंबेडकर जयंती साजरी केली. यावेळी त्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेतली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी व जिल्हाधिकारी कार्यालयात रवींद्र ठाकरे यांनी  डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, तहसीलदार प्रताप वाघमारे, अरविंद सेलोकर तर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, तहसीलदार सुधाकर इंगळे तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

महापालिकेतर्फे मुख्यालयामध्ये महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, नगरसेवक धर्मपाल मेश्राम उपस्थित होते.

आमदार प्रकाश गजभिये यांनी निवासस्थानी संविधान दीप लावत व संविधानाचे वाचन करून अभिवादन केले. प्रकाश पाटणकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भीमगीत सादर केले.