इतर आठपट गैरकरोना रुग्णांचे हाल; मेडिकल- मेयो रुग्णालयातील धक्कादायक चित्र

महेश बोकडे

नागपूर : करोनाचा प्रभाव ओसरल्याने मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत शंभरही करोनाचे रुग्ण नाहीत. उलट गैरकरोनाचे अत्यवस्थ रुग्ण दोन्ही रुग्णालयांत वाढत आहेत. तरीही दोन्ही रुग्णालयांत ८० टक्के जीवनरक्षण प्रणाली यंत्र (व्हेंटिलेटर ) आजही करोनाग्रस्तांसाठीच राखीव असल्याने गैरकरोनाच्या रुग्णांचे हाल होत आहेत. काहींना तर थेट बाहेरचा रस्ताच दाखवला जात असल्याच्याही तक्रारी आहेत.

मेडिकलमध्ये सध्या एकूण १ हजार ८०० च्या जवळपास  खाटा आहेत. त्यातील सुमारे ९०० खाटा करोना रुग्णांसाठी राखीव  असून इतर खाटा गैरकरोना रुग्णांसाठी  आहेत. मेयो रुग्णालयात एकूण ९०० खाटा आहेत. त्यातील काही दिवसापूर्वीपर्यंत ६६० खाटा करोनाग्रस्तांसाठी तर इतर खाटा गैरकरोनाग्रस्तांसाठी राखीव होत्या. परंतु  निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे सध्या  करोनाग्रस्तांसाठी केवळ १ वार्ड व १ अतिदक्षता विभाग सोडून इतर सर्व वार्ड गैरकरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध केले गेले. परंतु आताही मेडिकलमध्ये ३० व्हेंटिलेटर गैरकरोनाच्यारुग्णांसाठी  तर इतर सुमारे २०० च्या जवळपास व्हेंटिलेटर करोनाग्रस्तांसाठी ठेवण्यात आले आहेत. मेयो रुग्णालयातही सुमारे महिन्याभरापूर्वीपर्यंत १९० पैकी सुमारे ४४ व्हेंटिलेटर नादुरुस्त होते. यापैकी १३ कायमचे नादुरूस्त झाले असून इतर ३१ दुरुस्ती प्रक्रियेत आहेत. सध्या मेयोत सुमारे १५० व्हेंटिलेटर्स करोनाग्रस्तांसाठी तर शिल्लक व्हेंटिलेटर्स गैरकरोनाग्रस्तांसाठी आहेत.  मेडिकल- मेयोत सध्या सुमारे १०० करोनाग्रस्त रुग्ण दाखल असून गैरकरोनाचे  ८०० हून अधिक रुग्ण दाखल आहेत. त्यातील बरेच रुग्ण अत्यवस्थ आहेत. दरम्यान, दोन्ही रुग्णालयात  कुणी अत्यवस्थ  रुग्ण आल्यास त्याला व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगत बाहेरचा रस्ता दाखवला जातो.  मेडिकलचे डॉक्टर मेयोत तर मेयोतील डॉक्टर मेडिकलला रुग्ण हलवण्याचा सल्ला देत असल्याच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत.

अधिष्ठाता काय म्हणतात?

मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया म्हणाले, सध्या मेयोत गैरकरोनाग्रस्तांसाठी ३० ते ३६ च्या दरम्यान व्हेंटिलेटर आहेत. ही संख्या येथील अतिदक्षता विभागाच्या तुलनेत पुरेशी आहे. परंतु गरज भासल्यास प्रशासन हे यंत्र वाढवण्यास तयार आहे. मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, येथे गैरकरोनाचे रुग्ण वाढत असले तरी प्रशासन त्यांच्या उपचारासाठी पूर्ण काळजी घेत  आहे.  त्यानुसार येथेही गरज भासल्यास  यंत्र वाढवले जातील.