मानवाने तयार केलेले हे पहिलेच स्मारक

नागपूर : उल्कापाताने ५० हजार वर्षांपूर्वी लोणार विवर तयार झाले. आता त्याच परिसरात उभ्या दगडांची वर्तुळाकार संरचना(स्टोन सर्कल) आढळून आली आहे. इंग्लंडमध्ये अशा संरचनेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला आहे. मात्र, लोणारची ही वास्तू अजूनही या दर्जाच्या प्रतीक्षेत आहे.

लोणारमध्ये मानवाने तयार केलेले हे पहिलेच स्मारक आहे. इ.स. पूर्व ३०३२ ते ५००० पर्यंत ज्या ज्या ठिकाणी युद्धांमध्ये मानवी मृत्यू झाले, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभ्या दगडांची वर्तुळाकार संरचना केली जाते. लोणारमधील ही संरचना याच काळातील आहे. मृत व्यक्ती स्थानिक जमातीतील सरदार असेल तर ज्याठिकाणी त्याचे दहन किंवा दफन करण्यात आले, त्याठिकाणी त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ असे दगड लावले जातात. लोणारमधील या संरचनेचा शोध २०१८ मध्ये लागला. अलीकडच्या काळात जी काही स्मारकं दिसून येतात, ती साधारणपणे हजार-बाराशे वर्षांपूर्वीची आहेत. लोणारच्या या संरचनेला सुमारे पाच हजार वर्ष पूर्ण झाली आहेत. लोणार विवर परिसरात एक धारेच्या वर आणि एक पाप-हरेश्वरच्या वर दोन सतीशिळा देखील आहेत. या सतीशिळा चोरीलाही जाऊ शकतात. एक अगदीच वरती असून अतिशय चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण व संवर्धन होणे अतिशय आवश्यक आहे. लोणारमधील उभ्या दगडांच्या संरचनेजवळ कुणीही प्रवेश करू नये म्हणून केवळ कुंपण घालण्यात आले आहे. मात्र, अभ्यासाच्या दृष्टीने पुढील कालावधीसाठी या वास्तूच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

इंग्लंडमध्ये उभ्या दगडांच्या वर्तुळाकार संरचनेला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. त्या ठिकाणी या संरचनेपासून ३०० मीटपर्यंत ‘लॉन’ केले आहे. आपल्याकडील या संरचनेतील दगड तुटलेले आहेत. हा वारसा जतन करण्यासाठी त्याला जागतिक वारसा म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.

– चमू ‘मी लोणारकर’

* उभ्या दगडांची वर्तुळाकार संरचना(स्टोन सर्कल) हे वारसा स्थळ आहे. सद्यस्थितीत त्याच्या संवर्धनासाठी असा कोणताही आराखडा नाही. याबाबत नागपूरच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातूनच अधिक माहिती मिळू शकेल, असे लोणार येथील पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातील अधिकारी हेमंत हुकरे यांनी सांगितले. मात्र, नागपूर येथील विभागाशी संपर्क साधला असताना तेथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.