दिवसभराच्या उकाडय़ानंतर विदर्भातील बहुतांशी शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये ढगाळ वातावरण असून सायंकाळी काही वेळ वादळी पाऊस झाला. नागपुरातही सायंकाळी तुरळक सरी पडल्या. गडचिरोली जिल्ह्य़ात एका गावात साखरपुडय़ाचा सोहळा सुरू असताना वीज पडल्याने २३ जण जखमी झाले. शनिवारी चंद्रपूरचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवरून ३९, तर नागपूचे ४४ अंशावरून ४१.८ वर आले आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू असतांना कुरखेडा तालुक्यातील पिटेसूर येथे हरामी यांच्या घरी साखरपुडय़ाचा सोहळा सुरू असतांना मंडपावरच वीज कोसळून २३ जण जखमी झाले. यातील २ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासह अहेरी परिसरातही पाऊस झाल्याची माहिती आहे. चंद्रपूर शहर व जिल्ह्य़ात शनिवारी वादळी पावसाने हजेरी लावली. आज आकाश ढगाळ होते.
अमरावतीत सायंकाळी जोरदार वादळासह झालेल्या पावसामुळे काही भागात वृक्ष उन्मळून पडले, तर झोपडपट्टय़ांमधील काही घरांची छप्परे उडाली. अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला. या १० मिनिटांच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही. बडनेरा मार्गावर काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिवारी रात्रीही सरी बरसल्या. या जिल्ह्य़ातील नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे परिसरातही रविवारी सायंकाळी काही वेळ सरी बरसल्या. गोंदिया जिल्ह्य़ात ढगाळ वातावरण असून भंडारा जिल्ह्य़ात साकोली, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व गोरेगावात सायंकाळी वादळी पाऊस झाला.