मुदतपूर्व निवडणूक लादणाऱ्यांचा समाचार घेतला

१३ दिवसांचे सरकार गडगडल्यानंतर १९९८ मध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी केलेले भाषण अतिशय गाजले होते. हाऊसफुल झालेल्या कस्तुरचंद पार्कवर वाजपेयी यांनी सभा घेतली. सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकशाहीचे हृदयांचे ठोके असतात. जेव्हा हृदय गतीने धडधडत असले तर तेव्हा गंभीर समस्या निर्माण होते, अशा शब्दात त्यांनी मुदतपूर्व निवडणूक लादणाऱ्या विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला होता.

त्यावेळी वाजपेयी यांनी गोंदिया, अकोला आणि वर्धा येथे सभा घेतल्या होत्या. नागपुरात सायंकाळी सभा झाली. सुमारे एक ते दीड लाख लोकांची प्रचंड गर्दी होती. रस्त्यावर, फुटपाथवर लोक उभे राहून भाषण ऐकत होते.

नागपुरातील पिवळी नदीच्या परिसरात नागपूर सुधार प्रन्यासतर्फे गरीब लोकांना भूखंड देण्यात आले. या कार्यक्रमाला वाजपेयी यांना येण्याची विनंती करण्यात आली. यावेळी त्यांनी दिलेले भाषण अजूनही आठवते. त्यांनी राजस्थानी भाषेत काही उदाहरणे दिली. ते म्हणाले, गरिबांना खाण्यासाठी रोटला (भाकर) आणि राहण्यासाठी ओटला (घर) देणे आवश्यक आहे, अशी आठवण भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ता आनंदराव ठवरे यांनी सांगितले.

अटल जिंकले, अटल हरले

२००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नागपूर-कामठी लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे लोकसभा उमेदवार अटल बहादूरसिंग यांच्या प्रचारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आले.  ही तिरंगी लढत होती. काँग्रेसचे विलास मुत्तेमवार, विदर्भ राज्य पार्टीकडून बनवारीलाल पुरोहित आणि भाजपकडून अटलबहादूर सिंग लढत होते. अटलबहादूर सिंग मात्र या निवडणुकीत हरले. मुत्तेमवार यांनी त्यांचा पराभव केला. वाजपेयी यांनी सभा जिंकली, परंतु अटलबहादूर सिंग हरले.