पूल धोकादायक नसल्याचा खासगी संस्थेचा अहवाल; माहिती अधिकारातील तपशील

सार्वजनिक बांधकाम विभागाने नागपूर जिल्ह्य़ात उभारलेल्या ५३५ पुलांपैकी केवळ २० पुलांची संरचनात्मक तपासणी करण्यात आली असून ते धोकादायक नसल्याचा अहवाल खासगी एजन्सीने दिला आहे. दक्षिण मुंबईत मार्च महिन्यात एक पूल कोसळल्याने सहा जणांचे प्राण गेले होते. या पुलाला देखील संरचनात्मक तपासणीत धोकादायक नसल्याचे सांगण्यात आले होते.

मुंबईतील खासगी एजन्सीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ २० पुलांची संरचनात्मक तपासणी केली आहे. इतर पुलांवरून सुरक्षित वाहतुकीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. रस्ता वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून विशिष्ट कालावधीनंतर पुलांची संरचनात्मक तपासणी केली जाते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे नागपूर जिल्ह्य़ात ५३५ लहान-मोठे पूल आहेत. पावसाळा लागण्यापूर्वी या पुलांची तपासणी करण्यात आली. त्यासाठी मुंबई येथील एससीजी कन्सलटन्सी सव्‍‌र्हिस या एजन्सीला नियुक्त करण्यात आले. या एजन्सीला  २० पैकी एकही पूल धोकादायक आढळून आला नाही. यामध्ये प्रामुख्याने कामठी, वारेगाव, देहगाव या रस्त्यावरील कोलार नदीवरील पूल, रामटेक, मौदा रस्त्यावर कन्हान नदीवरील पूल, नागपूर, काटोल, जलालखेडा रस्त्यावर वर्धा नदीवर पूल, कन्हान, तारसा, आरोली रस्त्यावरील सूर नदीवरील मोठय़ा पुलांचा समावेश आहे. यामध्ये रामटेक-मौदा राज्यमार्ग क्रमांक ३३९ साखळी क्रमांक ३५/०० मध्ये कन्हान नदीवरील ब्रिटीशकालीन पूल आहे. हा पूल संरचनात्मक तपासणीत धोकादायक आढळून आला नाही. मात्र, या पुलाची मुदत केव्हाच संपली आहे. त्यामुळे या पुलावरील जड वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आले आहे. धोकादायक नाही तर या पुलावरून जडवाहतूक बंद का करण्यात आली, हा प्रश्न आहे.  दरम्यान, जिल्ह्य़ात जानेवारी

२०१६ ते ३० जून २०१९ या कालावधीत १३ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे, असा तपशील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना प्राप्त झाला आहे.