महेश बोकडे

उपराजधानीत एसटीच्या प्रवासी सेवेला प्रतिबंध आहे. परंतु जिल्ह्य़ात शुक्रवारपासून प्रवासी बससेवा सुरू झाली. पहिल्या दिवशी धावलेल्या एकूण ७८ बस फेऱ्यांमध्ये एसटीला केवळ ७४ प्रवासी मिळाले. त्यातून दोन हजारांचे उत्पन्न मिळाले. दुसरीकडे   एसटीला १८ हजारांचा खर्च आला.

लाल क्षेत्रात असल्याने नागपूर शहरात एसटीला  प्रवेश नाही. परंतु ग्रामीण भागात सेवा सुरू झाली. पहिल्या दिवशी शुक्रवारी महामंडळाकडून ११४ बसेसच्या मदतीने ३ हजार ९५० किलोमीटर मार्गावर  नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात बसमध्ये एक किंवा  दोन प्रवासी होते. त्यामुळे निम्या फेऱ्या रद्द केल्या.  दिवसभऱ्यातील ७८ फेऱ्यांमध्ये प्रशासनाला केवळ ७४ प्रवासी मिळाले.  शुक्रवारी केवळ १,३०० किलोमिटर मार्गावरच एसटी धावली. यासाठी एसटीला १८ हजार २०० रुपये खर्च आला  तर टिकिटांच्या उत्पनातून उत्पन्न केवळ २ हजार रुपये मिळाले.  त्यातच सेवा देणाऱ्या प्रत्येक बसवर एक चालक आणि एक वाहक कार्यरत होता. त्यांच्यासह इतरांचे वेतन काढल्यास हा आर्थिक फटका खूप मोठा आहे.

हळूहळू प्रवासी वाढतील

‘‘पहिल्या दिवशी एसटीच्या प्रत्येक फेरीला एक किंवा दोन प्रवासी होते. दुसऱ्या दिवशी (शनिवारी) ही संख्या दोन ते तीन प्रवाशांवर गेल्याची प्राथमिक माहिती आहे. टाळेबंदीनंतर प्रथमच प्रवासी सेवा सुरू झाल्याने प्रतिसाद कमी असला तरी हळूहळू तो वाढण्याची आशा आहे. शनिवारी ११४ बसेसचे ३ हजार ९५० किलोमीटर प्रवासाबाबतचे नियोजन प्रशासनाने केले आहे.’’

– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर.

या मार्गावर धावतेय लालपरी

एसटीने उमरेड आगाराहून कुही, मांढळ, सिर्सी, अंभोरा, भिवापूर आगारापर्यंत व तेथून परत उमरेडपर्यंत, रामटेक आगाराहून सावनेर, मौदा आगारापर्यंत व तेथून परत रामटेकपर्यंत, सावनेर आगारातून काटोल (तिष्टी मार्गे), काटोल  (सावरगांव मार्गे), कळमेश्वर आगारापर्यंत आणि तेथून पुन्हा रामटेकपर्यंत, काटोल आगारातून नरखेड, काटोल, कळमेश्वर, लोहारीसावंगा आगारापर्यंत व तेथून परत काटोलपर्यंतच्या बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.