|| देवेश गोंडाणे

विद्यापीठाकडे तक्रारी वाढल्या :- विद्यापीठाचे विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक आणि आंतरिक परीक्षांच्या गुणांसाठी वेठीस धरून नाहक त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी विद्यापीठाकडे आल्या आहेत. मात्र, या तक्रारींवर केवळ अहवाल मागवणे, समित्या तयार करणे यापलीकडे कारवाई होताना दिसत नाही. धाडस करून काही विद्यार्थिनी पुढे येत असल्या तरी त्यांच्या पदरी निरोशा येत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये अनेक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात, तर सत्रांत परीक्षा पद्धती सुरू झाल्यापासून आंतरिक गुणांची   पद्धतीही लागू झाली. याचे  गुण हे संबंधित विषय शिक्षकांकडे असतात. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हा विद्यार्थिनींच्या करिअरच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असतो. त्यात पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होण्यासाठी आंतरिक गुणांची चांगलीच मदत होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालाची बरीच मदार ही या गुणांवर असते. विद्यार्थिनींच्या याच अगतिकतेचा फायदा प्राध्यापकांकडून घेतला जात असल्याच्या अनेक तक्रारी विद्यापीठ आणि महाविद्यालयांकडे येतात. गुण वाढवून देण्याचे आमिष देणे, किंवा प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची धमकी देत दबाव निर्माण करणे असे नित्याचेच प्रकार झाल्याचे तक्रारींवरून दिसून येते. अशा पुरुषी मानसिकतेला अनेक विद्यार्थिनी बळी पडतात. यातील काहीच मुली धाडस करून पुढे येत तक्रारी देतात.

विद्यार्थिनींच्या या तक्रारींची गंभीर दखल घेत असल्याचा देखावा करीत विद्यापीठ प्रशासन सुरुवातीला समिती तयार करून अहवाल तयार करते. मात्र, पुढे या प्रकरणामध्ये काहीच होत नसल्याचे आजवरच्या तक्रारींवरून दिसून आले आहे.

काही  गाजलेल्या तक्रारी

वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) संस्कृत विभागातील विद्यर्थिनींनी प्राध्यापकाविरोधातच तक्रार केली होती.  तिला एम.ए.(संस्कृत) शेवटच्या वर्षांत अनुत्तीर्ण करील अशा सातत्याने धमक्याही देण्यात आल्या होत्या. अशा इतरही तक्रारी होत्या.  मात्र, शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुली गप्प होत्या. शेवटी या विद्यर्थिनींना महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या आंतरिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आल्याने त्यांनी समोर येत तक्रार केली. याप्रकरणी समिती नियुक्त करून चौकशी करण्यात आली होती. मात्र, पुढे त्या संबंधित प्राध्यापकांवर काय कारवाई झाली हे अद्याप कोणाला कळले नाही.

जाणीवपूर्वक अंतर्गत मूल्यांकनात कमी गुण दिल्याच्या आरोपावरून ललित कला विभागातील विद्यार्थिनी प्रियंका ठाकूर व सहायक प्राध्यापिका डॉ. संयुक्ता थोरात यांच्यात वाद सुरू होता. या प्रकरणात डॉ. थोरात यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावण्यात आली होती. मात्र, पुढे या प्रकरणातही कुठलीही कारवाई झाली नाही हे विशेष.

विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर यांच्याविरोधात एम.एड. विभागातील माजी विद्यर्थिनीने छेळ केल्याची धक्कादायक तक्रार विद्यापीठाकडे आली होती. निवृत्त असूनही या विद्यार्थिनीला प्रबंध तयार करताना मदत करणे, चांगले गुण मिळवून देतो असे आश्वासन देउन तिच्या अगतिकतेचा फायदा घेण्याचा प्रकार या विभागात घडला होता. मात्र, पुढे या प्रकरणातही प्रशासनाने हातवर केले असून तक्रारकर्त्यां विद्यार्थिनीवर दबाव निर्माण करून तक्रारच मागे घ्यायला लावली होती.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाची (एम.एड.) विद्यार्थिनी प्रीती फडके हिने तर विभाग प्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यासह काही प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आपण अनुसूचित जातीची विद्यार्थिनी असल्याने आपल्या शैक्षणिक भविष्याचे नुकसान करण्यासाठी या शिक्षकांनी प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला होता. मात्र, या प्रकरणावर विद्यापीठाची तपासणीच सुरू आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीने न्यायालयातन जाऊन अंतर्गत परीक्षेच्या गुणांसाठी लढा जिंकला.

‘‘ विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या सर्व समस्या या तक्रार निवारण समितीपुढे मांडून त्यांना १५ दिवसांच्या आत न्याय देणे नवीन विद्यापीठ कायद्याने बंधनकारक आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारी आल्यास त्याला आधी प्राधान्य देण्यात येते.’’– डॉ. अभय मुद्गल संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग